◼️ पोलिस बांधवांना “शुगर टेस्ट मशीन किट” वाटप करून जपली समाजिक बांधिलकी
राजापूर – लांजा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय व कार्यसम्राट आमदार किरण (भैय्या) सामंत ह्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त राजापूर, लांजा, साखरपा ह्या त्यांच्या कार्यक्षेत्रासह रत्नागिरी मध्ये देखील आमदार किरण सामंत ह्यांच्या मोठ्या प्रमाणावर असलेल्या कार्यकर्ते, हितचिंतक व चाहत्यांनी वेगवेगळे समाजिक उपक्रम राबविले. त्यामधील राजापूर तालुक्यातील पाचल येथील अमित साळवी ह्यांनी एक वेगळा व अनोखा उपक्रम राबविला असून त्यांच्या ह्या उपक्रमाचे लांजा व राजापूर तालुक्यामध्ये कौतुक होत आहे.
अमित साळवी हे राजापूर तालुक्यातील पाचल येथील तरुण उद्योजक असून गेली सुमारे 10 वर्षे ते आपल्या “गायत्री डिस्ट्रिब्युटर्स” ह्या व्यवसायातून औषधे व वैद्यकीय साहित्य विक्री करत आहेत. अमित साळवी हे पाचल येथील ज्येष्ठ शिवसैनिक आणि माजी विभागप्रमुख आप्पा साळवी ह्यांचे चिरंजीव असून तळवडे ग्रामपंचायतीच्या बिनविरोध निवडून आलेल्या सरपंच सौ. गायत्री साळवी ह्यांचे पती आहेत. साळवी कुटुंबीय गेली अनेक वर्षे पाचल येथे अनेक समाजिक कामांमध्ये सहभागी होत असते. अमित साळवी हे आपला व्यवसाय सांभाळून समाजिक बांधिलकीतून जनतेची सेवा करत असतात.
आजच्या जलद जीवनशैलीमध्ये सर्वच नागरिक आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेताना दिसतात. प्रत्येकजण आपल्या निरोगी जीवनासाठी सतर्क राहण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु सर्वसामान्य नागरिकांचे जीवन सुकर व्हावे, सामान्य नागरिकांचे रक्षण व्हावे ह्यासाठी अविरत झटणाऱ्या पोलिस बांधवाना मात्र सामान्य नागरिकांच्या सेवेसाठी आपल्या आरोग्याशी तडजोड करावी लागते. पोलिस बांधव आपल्या व्यस्त दिनचर्येमुळे आपल्या आरोग्यासाठी पाहिजे तेवढा वेळ देऊ शकत नाहीत. त्याचे परिणाम त्यांच्या आरोग्यावर होताना अनेकदा दिसतात. पोलिस बांधवांच्या आरोग्याचा विचार करून आमदार किरण सामंत ह्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत राजापूर तालुक्यातील पाचल येथील तरुण उद्योजक अमित साळवी ह्यांनी लांजा, राजापूर व नाटे पोलिस स्थानकांतर्गत असलेल्या सुमारे 150 पोलिस बांधवाना “पट्टी व शुगर टेस्ट मशीन” अश्या एकत्र किट चे वाटप केले. अमित साळवी ह्यांनी वाटलेल्या ह्या मशीन किट मुळे आता पोलिस बांधवाना आपल्या घरीच स्वतःच्या रक्तातील साखरेचे प्रमाण तपासणी करता येणार आहे.
दि. 7 जानेवारी रोजी अमित साळवी ह्यांच्यातर्फे आमदार किरण (भैय्या) सामंत व युवासेना कार्यकारिणी सदस्य, महाराष्ट्र तसेच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन च्या सदस्या अपूर्वाताई सामंत ह्यांच्या हस्ते पोलिस बांधवाना “शुगर टेस्ट मशीन किट” चे वाटप करण्यात आले. त्यावेळी पोलिस बांधवानी अमित साळवी व सामंत कुटुंबियांचे आभार मानले. अमित साळवी ह्यांनी राबवलेल्या ह्या विशेष व अनोख्या उपक्रमाचे पोलिस बांधवांसह सर्वसामान्य नागरिकांनी कौतुक केले आहे.
