“आस्थाच्या ‘सुपर मॉम’ पुरस्काराच्या यंदाच्या मानकरी ठरल्या सौ. ज्योत्स्ना अजित कुळये”—
आस्था सोशल फाउंडेशन रत्नागिरी या दिव्यांगांसाठी समर्पित संस्थेकडून दरवर्षी 8 मार्च जागतिक महिला दिनी ‘सुपर मॉम’ हा पुरस्कार देण्यात येतो. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व रक्कम रुपये पाच हजार चा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरूप असते. आणि यंदाच्या या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत सौ. ज्योत्स्ना अजित कुळये, त्या उमराड गुहागरच्या माहेरवाशीण व गोविळ,लांजा येथील सासरवाशिण पण उदरनिर्वासाठी लग्नानंतर मुंबईला असतांना 2007 साली त्यांच्या मोठ्या मुलाचा देवेश चा जन्म झाला. परंतु डॉक्टरांनी सांगितले की देवेश ला मणक्याचा आजार आहे, एक दोन नाही देवेशच्या 14 छोट्या मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या, परंतु देवेश स्वतःच्या पायावर उभा राहू शकला नाही. पण ज्योत्स्ना ताई सासरच्या मंडळीच्या आधाराने खंबीर उभ्या राहिल्या. सुरुवातीला त्याला विशेष शाळेत प्रवेश दिला, परंतु त्याची बुद्धिमत्ता चांगली असल्याने त्याला सामान्य शाळेत ज्योत्स्ना ताईने दाखल केले. रोज त्याला उचलून घेऊन जाऊन शाळेत व्हील चेअर वर बसवायचं आणि तिथेच थांबून परत शाळा सुटली की परत घरी आणायचं. दिवसभर शाळेत बसून असल्यामुळे तेथील मुख्याध्यापिकांनी ज्योत्स्ना ताईंना बाल वर्गाला शिकवण्याची संधी दिली. दहावी शिक्षण झालेल्या ताईंनी त्याचेही सोने केले. लॉकडाऊन लागले म्हणुन त्या देवेश ला घेऊन रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील बेणी गावात धनावडे नर्सरी मध्ये त्यांचे पती अजित महादेव कुळये काम करत होते तेथे राहण्यासाठी आल्या. आणि मग पुढे लॉकडाऊन नंतर देखील त्यांनी इकडेच राहण्याचा निर्णय घेतला व देवेशला न्यू इंग्लिश स्कूल लांजा येथे प्रवेश दिला. इकडे त्याला रोज रिक्षा शाळेत ने आण करत चालु असलेल्या संघर्षाचे चीज झाले. देवेश 74% गुण मिळवून दहावी पास झाला.
देवेश ला ऐकण्याचा देखील त्रास असल्यामुळे त्यांनी अकरावी कॉमर्स ला तु.पुं.शेटये कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतला. या मायलेकाच्या जिद्दीची दखल घेत, अकरावी बारावीला त्याला उडान दिव्यांग शिष्यवृत्ती मिळाली आहे.यावर्षी देवेशने बारावीची परीक्षा दिली आहे. अत्यंत संघर्षमय परिस्थितीत आपल्या 85% बहुदिव्यांग मुलाला जिद्द, चिकाटीने यशस्वी व स्वावलंबी नागरिक म्हणून घडवण्यासाठी घेतलेल्या अपार कष्टा ला,मातृवाला वंदन करत आस्था ने त्यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन “सुपर मॉम “पुरस्कार दिला. विशेष म्हणजे त्यांच्या सासूबाई श्रीम. मंदाकिनी महादेव कुळये यांचा देखील त्यांना खंबीर पाठिंबा आहे.या प्रसंगी आस्थाच्या सचिव श्रीम. सुरेखा पाथरे,श्री. संकेत चाळके, हसना नेवरेकर, आल्हाद पाथरे उपस्थित होते.
