रत्नागिरी : महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी–संगमेश्वरचे आमदार मा. उदयजी सामंत आणि राजापूर–लांजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भैय्याशेठ सामंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, शहरातील प्रभाग क्रमांक ६ च्या नवनिर्वाचित नगरसेविका सौ. मेधा अविनाश कुळकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक भान जपत व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाला चालना देणारा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला.
या तिहेरी वाढदिवसाच्या शुभप्रसंगी दामले विद्यालयातील शिष्यवृत्ती (स्कॉलरशिप) योजनेत सहभागी झालेल्या ६० गुणवंत विद्यार्थ्यांना रत्नागिरी येथील “तारांगण” या विज्ञान व तंत्रज्ञानावर आधारित प्रात्यक्षिक केंद्राला शैक्षणिक भेट देण्याचा विशेष व नाविन्यपूर्ण उपक्रम आयोजित करण्यात आला.
माननीय उदयजी सामंत साहेबांच्या संकल्पनेतून साकार झालेले ‘तारांगण’ हे रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचे केंद्र ठरत असून, त्यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष विज्ञानाचा अनुभव घेता आला. त्याचप्रमाणे आमदार किरण उर्फ भैय्याशेठ सामंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक प्रेरणा निर्माण करणाऱ्या उपक्रमात त्यांचा सहभाग जोडण्यात आला, ही बाब विशेष उल्लेखनीय ठरली.
विद्यार्थ्यांनी तारांगणातील विविध वैज्ञानिक प्रयोग, अंतराळविज्ञानाविषयी माहिती तसेच शैक्षणिक चित्रफितींचा लाभ घेतला. या भेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी कुतूहल वाढून अभ्यासाची गोडी निर्माण झाल्याचे दिसून आले. यावेळी विद्यार्थ्यांनी अशा उपक्रमांमुळे अनेक विज्ञानविषयक माहिती मिळाल्याचे सांगत माननीय उदयजी सामंत साहेबांचे विद्यार्थ्यांसाठी तारांगणसारखी सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार मानले. या प्रसंगी मेधाताईंनी सर्व विद्यार्थ्यांना खाऊ व शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.
कार्यक्रमास शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका सौ. स्मितल पावसकर, नगरसेविका सौ. श्रद्धा हळदणकर, सौ. पूजा पवार, सौ. प्रीती सुर्वे, नगरसेवक राजीव कीर, सौरभ मलुष्ट्ये यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच शिवसेनेचे विभाग प्रमुख मनोज साळवी, विभाग संघटक नरेंद्र देसाई, उपशहरप्रमुख महिला सौ. प्रिया साळवी, विभागप्रमुख महिला सौ. सीमा कदम यांची उपस्थिती लाभली.
दामले विद्यालयाचे मुख्याध्यापक भगवान मोटे, सहशिक्षिका सौ. श्रद्धा गांगण, सिद्धी विचारे तसेच शिक्षक अक्षय जोगळेकर हेही कार्यक्रमास उपस्थित होते.
यावेळी ज्येष्ठ नगरसेविका सौ. स्मितलताई पावसकर यांनी मनोगत व्यक्त करताना सौ. मेधा कुळकर्णी यांच्या या अनोख्या उपक्रमाचे कौतुक केले. समाजासाठी आणि विशेषतः विद्यार्थ्यांसाठी असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणे ही स्तुत्य बाब असून, भविष्यात प्रभागातील महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठीही अशाच प्रकारचे उपक्रम राबवावेत, असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी बोलताना नगरसेविका सौ. मेधा कुळकर्णी म्हणाल्या,
“माननीय उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेब व आमदार किरण भैय्याशेठ सामंत साहेब यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने समाजोपयोगी उपक्रम राबविता आले आणि त्याच वेळी माझा वाढदिवसही विद्यार्थ्यांच्या हितासाठी साजरा करता आला, याचे विशेष समाधान वाटते.”
या कार्यक्रमास सौ. प्रिया भोळे, संगीता भुवड, वेदिका पावसकर, बने काका, हरीश चौगुले, रोहित सावंत, प्रवीण देसाई, शेखर लेले, शैलेश बेर्डे, संजय आठल्ये, उमेश कुळकर्णी आदी पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, लोकप्रतिनिधींचे वाढदिवस समाजहितासाठी साजरे करण्याचा आदर्श निर्माण झाल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.
तसेच या वाढदिवसाच्या औचित्याने सौ. मेधाताईंनी प्रभाग क्रमांक ६ मधील नगरपरिषदेच्या स्वच्छता कामात कार्यरत असलेल्या सर्व स्वच्छतादूतांचा भेटवस्तू देऊन सन्मान केला. या सन्मानामुळे आनंदित झालेल्या स्वच्छतादूतांनी मेधाताईंना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
