कोकणकोकणातील जांभळे मुंबई व पुण्यातील बाजारात दाखल

कोकणातील जांभळे मुंबई व पुण्यातील बाजारात दाखल

कोकणातील सावंतवाडी भागातून जांभळांची आवक पुणे व मुंबईतील बाजारात दाखल झाली आहेत किरकोळ बाजारात एक किलो जांभळांना ३५० ते ४०० रुपये दर मिळाले आहे. येत्या दहा ते पंधरा दिवसांत गुजरातमधील जांभळांचा हंगाम सुरू होणार आहे. गुजरातमधील जांभळे बाजारात दाखल झाल्यानंतर दरात आणखी घट होईल.

जांभळांचा हंगाम एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होतो. उन्हाळा सुरू झाल्यानंतर जांभळांना मागणी वाढते. कोकण, गुजरात, कर्नाटक, तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात जांभळांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात येते. कोकणातील सावंतवाडी भागातून श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील फळबाजारात जांभळांची आवक सुरू झाली आहे. किरकोळ बाजारात प्रतवारीनुसार जांभळांना ३५० ते ४०० रुपये किलो दर मिळाले आहे, अशी माहिती फळबाजारातील जांभूळ व्यापारी पांडुरंग सुपेकर आणि माउली आंबेकर यांनी दिली.

गुजरातमधील बडोदा भागात जांभळांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. गुजरातमधील जांभळांचा हंगाम १० ते १५ एप्रिलपर्यंत सुरू होईल. गुजरातमधील जांभळांची आवक सुरू झाल्यानंतर दरात घट होईल. साधारणपणे २०० ते २५० रुपये किलोपर्यंत गुजरातमधील जांभळांना दर मिळतील. गुजरातमधील जांभळे आकाराने मोठी असून, चवीला गोड आहे. गेल्या काही वर्षांपासून गुजरातमधील जांभळांना मागणी वाढत आहे. गुजरातपाठोपाठ कर्नाटकातील जांभळांची आवक मे महिन्यात सुरू होईल. जांभळांचा हंगाम जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. शेवटच्या टप्प्यात अहिल्यानगर भागातील श्रीगोंदा तालुक्यातून जांभळांची आवक सुरू होईल, असे त्यांनी सांगितले.

उन्हाळ्यात रानमेव्याला मागणी

जांभुळ, करवंदांना रानमेवा म्हटले जाते. उन्हाळ्यात जांभुळ, करवंदाची आवक वाढते. महाबळेश्वर, पाचगणी, लोणावळा, खंडाळा, माथेरान परिसरातून जांभूळ, करवंदांना मागणी वाढते.

जांभूळ मधुमेहावर गुणकारी असल्याने गेल्या काही वर्षांपासून जांभळांना मागणी वाढली आहे. जांभळावर प्रक्रिया करून सरबत, तसेच आईस्क्रीम तयार केले जाते. हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात जांभळांचे दर कमी होतात. त्यानंतर प्रक्रिया उद्योगांकडून जांभळांची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते.

Breaking News