कोकणात “उदय सामंतच धुरंधर” !
कोकणात उदय सामंत ह्यांचे नेतृत्व सर्वमान्य !
“कोकणचे नेते” ह्या बिरुदावलीवर “उदय सामंत” ह्या नावाने शिक्कामोर्तब !
दि. 23 डिसेंबर (प्रतिनिधी)
नुकत्याच राज्यभर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतर्गत नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. कालच म्हणजे दि. 21 डिसेंबरला निवडणुकांचे निकाल देखील जाहीर झाले. राज्यभर महायुतीने सर्वत्र घवघवीत यश संपादन केले. ह्यामध्ये शिवसेनेचे यश हे दैदिप्यमान मानावे लागेल असेच आहे. परंतु शिवसेनेच्या ह्या यशामध्ये खरी परीक्षा होती ती शिवसेनेच्या कोकणातील भवितव्याची ! कारण पूर्वीपासून कोकणातील जनतेने शिवसेनेला भरभरून प्रेम दिलेले आहे पण सन 2022 मध्ये एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर ही पहिलीच कार्यकर्त्यांची निवडणूक पार पडली आणि ह्या निवडणुकीमध्ये कोकणातील मतदार शिंदेंना साथ देतात की ठाकरेंच्या मागे उभे राहतात हे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे गणित ठरवणारे होते. परंतु एकनाथ शिंदे ह्यांनी उदय सामंत ह्या एका कुशल नेतृत्वाच्या हातात कोकणाची जबाबदारी दिल्यामुळे कोकणातील शिवसेनेचा विजय सुकर झाल्याचे दिसून आले. कोकणातील निवडणुक प्रचाराच्या कालावधीपासून ते निकाल येईपर्यंत मिळालेल्या शिवसेनेच्या यशाचे उदय सामंत हे शिल्पकार ठरले !
शिवसेनेचे उपनेते पद आणि राज्यात कॅबिनेट मंत्री पदी असलेले उदय सामंत राज्यभर पक्षवाढीसाठी झटताना कायमच दिसत असतात. निवडणुका नसताना देखील लोकांमध्ये जाऊन उदय सामंत राज्यभर दौरे करत असतात. त्यामुळे कोकणातील ह्या निवडणुका उदय सामंत ह्यांनी लिलया जिंकल्याचे दिसून आले.
उदय सामंत ह्यांनी नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये कोकण पिंजून काढत रत्नागिरीसह कर्जत, माथेरान, खोपोली, अलिबाग, श्रीवर्धन, महाड, खेड, चिपळूण, देवरुख, लांजा, राजापूर, कणकवली, मालवण येथे स्वतः जाहीर सभा घेतल्या. ह्या जाहीर सभांचा परिणाम निवडणूक निकालांमध्ये स्पष्ट दिसून आला आहे.
कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये उदय सामंत ह्यांनी खोपोली, श्रीवर्धन, महाड येथे सुनील तटकरे ह्यांना धक्का देत शिवसेनेचे वर्चस्व दाखवून दिले.
रत्नागिरी जिल्ह्याचा विचार करता चिपळूण मधील नगराध्यक्ष पदासाठी असलेली चुरस हाणून पाडत उदय सामंत यांनी नगराध्यक्ष पदासह विजय मिळवत शिवसेनेचे वर्चस्व दाखवून देत भास्कर जाधवांना चितपट केले. गुहागर आणि देवरुख ह्या नगरपंचायतींमध्ये भाजपाला जागा देऊन उदय सामंत यांनी मित्रपक्ष भाजप चा सन्मान राखत तिथे देखील मित्र पक्षाचे उमेदवार निवडून आणले. उदय सामंत यांच्या होम ग्राउंड रत्नागिरी नगर परिषदेचा विचार केला असता 32 पैकी 29 जागांवर महायुतीने विजय मिळवला आहे. ज्या 3 जागा विरोधी पक्षाकडे गेलेल्या आहेत त्या देखील उदय सामंत लवकरच आपल्या पक्षाकडे घेतील असे जाणकारांचे मत आहे. त्याप्रमाणेच विशेष उल्लेखनीय म्हणजे रत्नागिरी नगर परिषदेमध्ये आजपर्यंत मिळालेल्या मताधिक्याचा विचार करता सौ. शिल्पा सुर्वे यांना मिळालेले 10 हजारांचे मताधिक्य हे सर्वाधिक आहे. उदय सामंत यांनी रत्नागिरी शहरामध्ये मिळवलेले मताधिक्य हे विरोधकांचे भविष्यातील मनसुबे धुळीस मिळवून टाकणारे आहे. लांजा नगरपंचायतीमध्ये देखील उदय सामंत यांनी आपले बंधू आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वामध्ये मोठ्या फरकाने विजय मिळवत यश मिळवून दाखवले. राजापूर नगर परिषदेमध्ये जरी महायुतीला निम्म्या जागांवर समाधान मानावे लागले असले तरीदेखील जिथे शिवसेनेचे पूर्वी 2 नगरसेवक होते तिथे आज शिवसेनेने सामंत बंधूंच्या नेतृत्वाखाली 10 नगरसेवक निवडून आणले आहेत. भविष्यात सामंत बंधूंच्या नेतृत्वाखाली राजापूर नगर नगरपरिषदेवर देखील शिवसेनेचा भगवा फडकेल असे चित्र दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार राजापूर नगरपरिषद निवडणुकीमध्ये महायुतीतील अंतर्गत धुसफुस ही महायुतीच्या पराभवाचे कारण असल्याचे दिसून येते. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार केला असता कणकवलीमध्ये सत्तेत आलेल्या शहर विकास आघाडीच्या रणनीती मागे देखील उदय सामंतंच असल्याची चर्चा ऐकू येत असून उदय सामंतांनी मात्र त्याचे श्रेय जाहिरपणे घेतल्याचे दिसत नाही. मालवण मध्ये देखील उदय सामंत यांनी स्वतः सभा घेऊन चाणाक्ष खेळी करत तेथे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांची देखील जाहीर सभा घेतली. एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभेमुळे मालवण मधील राजकीय समीकरणे बदलली आणि तिथे शिवसेनेला घवघवीत यश प्राप्त झाले. वेंगुर्ला व सावंतवाडी येथे मात्र शिवसेनेला निसटत्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. एकूणच कोकणातील निवडून आलेल्या नगराध्यक्ष किंवा नगरसेवक उमेदवार तसेच लोकप्रतिनिधी यांच्याकडे माहिती घेतली असता निवडणुकी मागील राजकीय रणनीती ही उदय सामंत यांचीच होती हे स्पष्ट दिसून येते.
एकूणच कोकणातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा लेखाजोखा घेत विश्लेषण करत असताना असे दिसून येते की, कोकणात उदय सामंत यांचे नेतृत्व सर्वमान्य झाल्याचे सिद्ध होत आहे. “कोकणचे नेते” ह्या बिरुदावलीवर उदय सामंत यांच्या नावाने शिक्कामोर्तब झाले आहे.
प्रमोद डोईफोडे
ज्येष्ठ पत्रकार, मुंबई
