कर्नाटक -कुमठा स्थानकावर एक्स्प्रेसला थांबा दिला, पण दीड वर्षांपासून थांबा मिळावा ही मागणी करत असलेल्या संगमेश्वर करांना वाटाण्याच्या अक्षता!
✍🏻 रुपेश मनोहर कदम/ सायले
कोकण रेल्वे प्रशासनाने कर्नाटक राज्यातील कुमठा रेल्वे स्थानकात हिस्सार कोईम्बतूर या एक्स्प्रेसला थांबा दिला आहे. कोकण रेल्वेचे हे दुजेपणा संगमेश्वर तालुक्यातील जनतेच्या वाट्याला आले आहे. याची प्रचंड चीड निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर फेसबुक ग्रुपचे प्रमुख संदेश जिमन आणि अन्य सहकाऱ्यांना आली आहे.
आम्ही गेली दीड वर्ष संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकात तीन एक्स्प्रेसना थांबा मिळावा म्हणून मागणी करतो आहोत. कोकण रेल्वे प्रशासन थातूरमातूर कारण दाखवून दिरंगाई करीत आहे.
वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही थांबे मिळत नसतील तर ही कोकण रेल्वे नावाला फक्त कोकण रेल्वे आहे काय?
कोकण रेल्वेच्या उभारणीत ज्या राज्यांचा आर्थिक सहयोग कमी त्याच राज्यांना कोकण रेल्वे झुकते माप देत आहे. असा आरोप पत्रकार संदेश जिमन यांनी केला आहे.
अलिकडे छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्य गाथेवर आधारित छावा हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला. देशातील तमाम चित्रपट प्रेक्षकांना संगमेश्वरच्या ऐतिहासिक दर्जाची जाण झाली आहे. पर्यटकांच्या पसंतीस संगमेश्वर तालुक्यातील ऐतिहासिक स्थळे उतरत आहेत. अशातच रेल्वे कडून सुरूअसलेल्या या दिरंगाईमुळे सर्व स्तरांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.
गेल्या दीड वर्षापासून सुरू असलेल्या या लढ्यात कित्येक निवेदने झाली. प्रजासत्ताकदिनी उपोषण झाले. कोकण रेल्वेच्या बेलापूर कार्यालयात कित्येकदा बैठका झाल्या. पण उत्तर एकच मिळते…. रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव पाठविला आहे ! आमच्या मागण्या रास्त आहेत. प्रस्ताव जर का सकारात्मक असतील तर
थांबे मिळण्यास विलंब का ?