रत्नागिरीकोतवडे येथे किशोरवयीन मुलींना वैद्यकीय अधिकारी डॉ. मुक्तेश्वरी पाखरे यांचे मार्गदर्शन

कोतवडे येथे किशोरवयीन मुलींना वैद्यकीय अधिकारी डॉ. मुक्तेश्वरी पाखरे यांचे मार्गदर्शन

रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे येथे किशोर वयीन मुलींसाठी आरोग्य, मानसिक सशक्तीकरण व व्यक्तिमत्त्व विकास विषयक मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्राथमिक आरोग्य केंद्र कोतवडे च्या वैद्यकीय अधिकारी डॉ.मुक्तेश्वरी पाखरे यांनी उपस्थित मुलींना अत्यंत अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
कोतवडे ग्रामस्थ मंडळ, मुंबई संचलित कोतवडे हायस्कूल येथे हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, ग्रामस्थ मंडळाचे पदाधिकारी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. पाखरे यांनी किशोरवयीन मुलींमध्ये होणारे शारीरिक व मानसिक बदल, मासिक पाळी व्यवस्थापन, संतुलित आहार, वैयक्तिक स्वच्छता, तणाव व्यवस्थापन तसेच आत्मविश्वास वाढविण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. मुलींनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी अत्यंत समजेल अशा पद्धतीने उत्तरे दिली. यामुळे विद्यार्थिनींमध्ये जागरूकता व आत्मविश्वास निर्माण होणेकामी ही महत्वपूर्ण पाऊल आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी डॉ. मुक्तेश्वरी पाखरे यांच्यासोबत मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन केले. अशा प्रकारचे उपक्रम मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत आवश्यक असून भविष्यातही राबवावेत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

-(डॉ. अनिरुद्ध आठल्ये ),
जिल्हा आरोग्य अधिकारी,
जिल्हा परिषद रत्नागिरी

Breaking News