चिपळूणगांधी प्रतिष्ठान चिपळूण व चिपळूण नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने गांधारेश्वर, गांधीघाट येथे...

गांधी प्रतिष्ठान चिपळूण व चिपळूण नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने गांधारेश्वर, गांधीघाट येथे गांधीजयंती मंत्रमुग्ध वातावरणात संपन्न.

चिपळूण : चिपळूण नगरपरिषद व पूज्य गांधी प्रतिष्ठान आयोजित चिपळूण येथील महात्मा गांधी यांच्या रक्षाकलश स्मारका समोर गांधीजयंती दिनी बावीस शाळांतील विद्यार्थी,शिक्षक,पालक व गांधीप्रेमी नागरिकांनी महात्माजींना विनम्र अभिवादन केले. रत्नागिरी जिल्हास्तरीय घेतलेल्या निबंध व वक्तृत्व स्पर्धेत पाचशेहून अधिक प्राथमिक,माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला तर खुल्या गटात शिक्षक,प्राध्यापक,ग्रंथपाल, लेखक, अभियंता यांचाही मोठा सहभाग होता. या सर्वांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी चारही गटातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धेचा विषय होता, “म.गांधी यांचे कार्य व स्वच्छता-पर्यावरण.” कार्यक्रमाची सुरेल सुरवात चिपळूणच्या प्रसिद्ध गायिका सौ. उत्तरा साडविलकर यांनी गायलेल्या “ईश्वर अल्लाह तोरो नाम व खरा तो एकचि धर्म या गीतानी झाली. सौ. अमृता आशय होमकळस व सौ. छाया प्रशांत सातारकर यांनी त्याला साथ दिली.
त्यानंतर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. विनायक होमकळस सर यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश व उपस्थितांचे स्वागत केले तसेच नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मा. श्री. विशाल भोसले व त्यांचे सहकारी यांनी कार्यक्रम यशस्वीसाठी विशेष सहकार्य केल्याबद्दल आभार मानले. यावेळी गांधी विचारमंच वर उपस्थित माजी आमदार श्री. रमेशभाई कदम,श्री.जयद्रथ खताते,सुरेशशेठ राऊत,अतिशअप्पा खेडेकर, प्रशासकीय अधिकारी श्री. मंगेश पेडामकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. होमकळस व माजी नगराध्यक्षा सौ. सावित्री होमकळस यांच्या हस्ते पालिका प्रशासकीय अधिकारी श्री. मंगेश पेढामकर,आरोग्य विभाग प्रमुख श्री. वैभव निवाते,निरीक्षक सुजीत जाधव यांचा प्रतिष्ठानच्या वतीने पुष्प व ग्रंथभेट देऊन सन्मान करण्यात आला त्याचबरोबर स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम करणारे सर्वश्री मंहमद हुसैन मूसा, प्रा. गिरीराज पांडे,प्रा. विनायक बांद्रे व श्रीमती शरयु इंदूलकर यांना “युगात्मा” हा दुर्मिळ ग्रंथभेट देऊन सन्मानित करण्यात आले तसेच आदर्श कलाशिक्षक टी.एस.पाटील यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.
जिल्हा परिषद केंद्रशाळा कापरे मधील इयता चौथीतील कु. आदिती सनित भुर्के या छोट्या मुलीच्या भाषणाने सर्वांची मने जिंकली. प्राथमिक गटातील स्वराज कदम, माध्यमिक गटातील समृद्धी गोरे, कनिष्ठ महा.गट मैमुना पालटे, खुला गट अनुष्का संकपाळ व प्रा.फिजा खतीब या वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाने विजेत्या ठरलेल्यांची या प्रसंगी सुरेख भाषणे झाली त्याला उपस्थितांकडून भरभरून दाद मिळाली. या वेळी मान्यवरांच्या वतीने मनोगत व्यक्त करताना चिपळूणचे माजी आमदार रमेशभाई कदम यांनी नगरपरिषदेला धन्यवाद दिले तसेच गांधी प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक केले व विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन केले.
प्रतिष्ठानच्या सदस्य सौ. सई वरवाटकर यांनी कार्यक्रमाचे समयोचित व सुंदर सूत्रसंचलन केले तर सचिव सुनिल खेडेकर या पारितोषिकांचे वाचन केले तर सदस्य लियाकत शहा यांनी आभार मानले. प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष जाफर गोठे, कोषाध्यक्ष मंगेश वेस्वीकर, दिपक महाडीक तसेच सौ.सुनिता महाडिक, प्रशांत सातारकर, सौ.अमृता होमकळस, सौ.छाया साताराकर, सौ. सिमा कदम आदिंनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी काम केले. निसर्गसानिध्यातील गांधीघाट,गांधारेश्वर येथील कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद लाभला यामुळे संपूर्ण परिसर नागरिकांनी फूलून गेला होता. कार्यक्रम समाप्ती नंतर तरुण सामाजिक कार्यकर्ता मल्हार इंदुलकर यांनी वाशिष्ठी नदीत मासेमारी करणाऱ्यां कातकरी बंधुच्या समस्या, व्यथा प्रभावीपणे मांडल्या.

Breaking News