गुहागर तालुक्यातील तळवली येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम, सामाजिक वनीकरण विभागाच्या सहकार्याने वृक्षारोपण
‘इको क्लब’चा पर्यावरण संदेश, विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षलागवड, विद्यार्थ्यांनी घेतली वृक्ष संगोपनाची जबाबदारी
✒️ शाहिद अहमद तुळवे/कडवई
दि. ११ जुलै २०२६
पर्यावरण संरक्षण आणि निसर्ग संवर्धनाचा संदेश देत गुहागर तालुक्यातील तळवली येथील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. सामाजिक वनीकरण विभाग रत्नागिरी परिक्षेत्र गुहागर यांच्या सहकार्याने हा पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आला.
सध्याच्या काळात वाढते प्रदूषण, हवामान बदल आणि पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास लक्षात घेता वृक्ष संवर्धनाची गरज अधिक महत्त्वाची बनली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जनजागृती निर्माण व्हावी आणि निसर्गाशी त्यांचे नाते अधिक घट्ट व्हावे, या उद्देशाने प्रशालेतील ‘इको क्लब’च्या माध्यमातून वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी सामाजिक वनीकरण विभाग रत्नागिरीचे श्री. शिंदे साहेब उपस्थित होते. त्यांनी शालेय परिसरात वृक्षारोपणासाठी विविध प्रकारच्या वृक्षांची रोपे उपलब्ध करून दिली. सामाजिक वनीकरण विभागाच्या सहकार्यामुळे शाळेच्या परिसरात विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.
प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. एम. ए. थरकार सर, इको क्लब प्रमुख सौ. नाईक मॅडम, श्री. बागल सर, सौ. कांबळे मॅडम तसेच इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थी प्रतिनिधी यांच्या हस्ते शालेय परिसरात विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.
वृक्षारोपण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सौ. नाईक मॅडम, श्री. देवरुखकर सर आणि श्री. गवळी सर यांनी विशेष सहकार्य केले. तसेच श्री. अक्षय चव्हाण यांचेही या उपक्रमासाठी मोलाचे योगदान लाभले.
यावेळी मुख्याध्यापक श्री. एम. ए. थरकार सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, वृक्ष हे केवळ पर्यावरणाचे संरक्षण करणारे घटक नसून मानवाच्या अस्तित्वासाठी अत्यंत आवश्यक असलेली नैसर्गिक संपत्ती आहे. वृक्ष लावणे ही पहिली पायरी असून त्यांची योग्य निगा राखणे आणि संगोपन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरातील वृक्षांचे संरक्षण करून पर्यावरण संवर्धनात सक्रिय भूमिका बजावावी, असे आवाहन त्यांनी केले.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण झाली असून, लावलेल्या वृक्षांची नियमित देखभाल करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांनी स्वीकारली. शालेय परिसर हिरवाईने नटावा आणि भावी पिढीला स्वच्छ व सुंदर पर्यावरण मिळावे, हा संदेश या वृक्षारोपण कार्यक्रमातून देण्यात आला.
या कार्यक्रमास प्रशालेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. वृक्षारोपणाच्या माध्यमातून तळवली न्यू इंग्लिश स्कूलने पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
