मला उद्योग मंत्री म्हणून तिसऱ्या महाइंफ्रा कॉन्क्लेव्ह या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला वाय. बी. चव्हाण सेंटर, नरिमन पॉइंट येथे उपस्थित राहण्याची संधी मिळाली.
महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांची उभारणी कशी असावी, या क्षेत्रात सर्व संबंधितांनी कोणती भूमिका बजावली पाहिजे आणि शासनाची योग्य ती मदत कशी मिळावी, यासाठी या कॉन्क्लेव्हचे आयोजन करण्यात आल्याची भावना यावेळी व्यक्त केली.
महाराष्ट्रात विविध लहान-मोठे प्रकल्प सुरू असतात. हे प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावेत यासाठी शासनाला देखील मार्गदर्शन मिळावे आणि त्यानुसार कार्यवाही व्हावी, असे आवाहन या वेळी केले.
उद्योगमंत्री म्हणून मलाही आधुनिक तंत्रज्ञानाची आवश्यकता असते. अशा कार्यक्रमांमधून नव्या संकल्पना आणि तंत्रज्ञानाची ओळख होते, तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याला प्रगती साधता येईल, यावर भर दिला. नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे राज्याचा कायापालट शक्य आहे. त्यामुळे राज्यकर्ते आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांची मानसिकता आधुनिक असली पाहिजे, असे मत व्यक्त केले.
तंत्रज्ञानासोबत विश्वासार्हता जपणेही महत्त्वाचे आहे, आणि अशा उपक्रमांमधून त्याची शिकवण मिळते. उद्योगमंत्री म्हणून मी राज्यात उत्तम पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. त्यामुळे अधिकाधिक उद्योग महाराष्ट्रात येत आहेत आणि त्याचा राज्याच्या प्रगतीला मोठा फायदा होत आहे.
राज्य सरकार देशातील सर्वात मोठा एम-हब प्रकल्प कळंबोली येथे उभारत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून देशी-विदेशी कामगारांना प्रशिक्षण दिले जाणार असून, आवश्यक सर्व सुविधा सहज आणि सुलभरित्या उपलब्ध करून देण्याचा सरकारचा मानस आहे. उद्योग खात्याच्या माध्यमातून राज्य सरकार अशा सोयी-सुविधा पुरवत आहे, हे यावेळी अधोरेखित केले. सरकारसोबत सर्वांनी समन्वय साधून काम केल्यास शासनदेखील तुमच्या सोबत राहील, असे आश्वासन दिले. अशा कार्यक्रमांचे आयोजन फक्त राज्यस्तरावर न करता जिल्हा आणि विभागीय स्तरावरही करावे, अशी इच्छा व्यक्त केली. तसेच लघु व मध्यम उद्योगांना प्राधान्य देऊन त्यांची भरभराट होईल, असे मार्गदर्शन करण्यात यावे, जेणेकरून महाराष्ट्रातील लघु उद्योग अधिक सक्षम होतील.
महायुती सरकार तुमच्या सोबत आहे आणि राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध आहे, असा विश्वासही या वेळी व्यक्त केला.