रत्नागिरी, : भारतीय तटरक्षक दलाच्या स्थापनेला ५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने, भारतीय तटरक्षक अवस्थान रत्नागिरीच्या वतीने आज एका विशेष रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कोकण किनारपट्टीच्या, विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सागरी संरक्षणाची जबाबदारी सांभाळणाऱ्या या कार्यालयाने सुवर्ण महोत्सवी वर्षी सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम राबवला.
हे शिबिर भारतीय तटरक्षक अवस्थान रत्नागिरीद्वारा जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढी व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रत्नागिरी यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमाचा मुख्य उद्देश स्वेच्छा रक्तदानाचे महत्त्व पटवून देणे आणि सामाजिक सेवेची भावना जोपासणे हा होता.
या कार्यक्रमाचे उद्घाटन तटरक्षक केंद्र रत्नागिरीचे कमांडिंग ऑफिसर कमांडंट शैलेश गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात तटरक्षक दलाच्या जवानांसह २ महा नेव्हल युनिट एनसीसीच्या छात्रसैनिकांनी अत्यंत उत्साहाने सहभाग नोंदवला. विशेषतः एनसीसीच्या महिला कॅडेट्सचा सहभाग लक्षणीय होता. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व रक्तपेढीच्या तज्ज्ञ डॉक्टर आणि निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या पथकाने सर्व वैद्यकीय नियमांचे पालन करून रक्त संकलनाची प्रक्रिया पार पाडली. यात वैद्यकीय महाविद्यालयाच्या जनसंपर्क अधिकारी सौ प्रणाली आयरे, रक्तपेढीच्या वैज्ञानिक अधिकारी सौ मधुरा थोरात आणि जिल्हा रुग्णालयाच्या मुख्य परिचारिका सौ जयश्री कुंडाळकर यांचा प्रमुख सहभाग होता. तर तटरक्षक दलातर्फे शिबिराच्या आयोजनात तटरक्षक दलाचे वैद्यकीय अधिकारी सर्जन लेफ्टिनेंट कमांडर गोपन जी जे यांनी महत्वाची भूमिका बजावली.
यावेळी कमांडिंग ऑफिसर यांनी सर्व स्वयंसेवक, एनसीसी कॅडेट्स आणि वैद्यकीय पथकाचे आभार मानले. “तटरक्षक दल केवळ सागरी सीमांचे रक्षणच करत नाही, तर जनहिताच्या कार्यांना देखील प्राधान्य देत असते. सुवर्ण महोत्सवी वर्षात राबवलेला हा उपक्रम आमच्या ‘वयम रक्षामः’ या ब्रीदवाक्याला अधिक बळ देणारा आहे” अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली आणि सर्व वैद्यकीय व निमवैद्यकीय कर्मचारी आणि स्वेच्छा रक्तदान करणाऱ्या जवान व एनसीसी छात्रसैनिकांचे या मानवतावादी उपक्रमात सहभाग नोंदविल्या बद्दल आभार मानले.
