रत्नागिरी, दि. 24 (जिमाका):- महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग, कोकण मराठी साहित्य परिषद, मराठी भाषा समिती आणि रत्नागिरी नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या संकल्पनेतून त्यांच्या उपस्थितीत बुधवार 26 व गुरुवार 27 फेब्रुवारी रोजी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर वंदना मराठी भाषा गौरव दिन आणि कवी कुसमाग्रज जयंती उत्सव येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती मराठी भाषा समिती सदस्य सचिव उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी दिली.
बुधवार 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर हे रत्नागिरीमध्ये स्थानबध्द असताना शिरगाव या ठिकाणी ज्या घरात वास्तव्यास होते, त्या रविंद्र दामले यांच्या घरी स्वातंत्र्यवीर सावरकर वंदना सायंकाळी 7 वाजता, स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात सागरा प्राण तळमळला हे दोन अंकी नाटक होणार आहे. नाटकासाठी प्रवेश विनामुल्य आहे.
गुरुवार 27 फेब्रुवारी रोजी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात सकाळी 10 वाजता कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार किरण सामंत यांच्या हस्ते मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी हे प्रमुख पाहुणे तसेच निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, कोमसापचे विश्वस्त प्रमुख रमेश कीर, माजी नगराध्यक्ष राहुल पंडित, कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन पाटील, मुख्याधिकारी तुषार बाबर आदी प्रमुख उपस्थितीत असणार आहे.
सकाळी 11 ते दुपारी 12.30 वाजता मराठीला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा, मराठी माणसाचे योगदान आणि शासनाची भूमिका या परिसंवादात निवासी उपजिल्हाधिकारी श्री. सूर्यवंशी, विश्वस्त प्रमुख श्री. कीर, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. तानाजीराव चोरगे सहभागी होणार आहेत. दुपारी 12.30 ते 2 वाजता अरुण मौर्ये, अमेय धोपटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कोपसाप, शिक्षण विभाग आणि महसूल विभागातील नामवंत कवींचे संमेलन होणार आहे. दुपारी 2.30 ते 4 वाजता बक्षीस वितरण आणि समारोप होणार असून, माजी नगरसेवक बिपीन बंदरकर, अभिजित गोडबोले, कोमसापचे जिल्हाध्यक्ष प्रा. आनंद शेलार उपस्थितीत राहणार आहेत. सायंकाळी 5 वाजता ग्रंथदिंडी आणि सायंकाळी 7 वाजता मराठी पाऊल पडते पुढे कार्यक्रम होणार आहे.
000