👉दापोली :- दापोली तालुक्यातील विरसई ग्रामपंचायतीने पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’ अंतर्गत कोकण विभागात प्रथम क्रमांक पटकावला असून ५० लाख रुपयांचे पारितोषिक मिळवले आहे. महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमात सातत्यपूर्ण कामकाज आणि लोकसहभागाच्या जोरावर विरसईने हे यश संपादन केले आहे.
या अभियानाअंतर्गत ग्रामपंचायतीने विविध पर्यावरणपूरक उपक्रम प्रभावीपणे राबवले. गावात व्यापक जनजागृती मोहीम राबवि ण्यात आली.वृक्षलागवड मोहिमेद्वारे मोठ्या प्रमाणावर झाडे लावण्यात आली तसेच प्लास्टिक बंदीची कठोर अंमल बजावणी करण्यात आली.घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापना साठी स्वतंत्र उपाययोजना करून गाव स्वच्छ व पर्यावरणस्नेही ठेवण्यावर भर देण्यात आला.जलसंवर्ध नाच्या दृष्टीने बंधारे बांधणे तसेच पाणी अडवा पाणी जिरवा’ उपक्रम प्रभावी पणे राबवण्यात आले.
छतावरील पाणी संकलनासाठी विरेश्वर विद्यालय तसेच ग्रामपंचायत कार्यालयात रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रणाली कार्यान्वित करण्यात आली. यामुळे पाण्याची बचत होऊन भूजल पातळी वाढीस मदत झाली आहे.
या यशामागे ग्रामस्थांचा मोठा सहभाग लाभला. विरसई जनसेवा मंडळ (मुंबई व ग्रामीण), विरसई जनसेवा महिला मंडळ, विरेश्वर विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, अंगणवाडी सेविका, आदर्श जिल्हा परिषद मराठी शाळेतील शिक्षक व विद्यार्थी तसेच मौजे खरवते येथील ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य मिळाले.
सामूहिक सहभाग आणि जबाबदारीची जाणीव यामुळे विरसई गावाने पर्यावरण संवर्धनात आदर्श निर्माण केला आहे. सरपंच,उपसरपंच सर्व सदस्य, ग्रामविकास अधिकारी व कर्मचाऱ्यांनी योजनाबद्ध नियोजन करून प्रत्येक उपक्रम प्रभावीपणे अंमलात आणला.
या पारितोषिकातून मिळालेल्या ५० लाख रुपयांचा उपयोग पुढील पर्यावरणपूरक व शाश्वत विकासाच्या कामांसाठी करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामपंचायतीतर्फे देण्यात आली.
