महाराष्ट्र शासनाने एक ऐतिहासिक निर्णय घेत आज लंडनमधील बृहन महाराष्ट्र मंडळाच्या इमारतीला ९९ वर्षांच्या करार तत्वावर घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
१९३२ पासून परदेशात मराठी संस्कृती, परंपरा व उत्सवांचा ध्वज उंचावणाऱ्या या संस्थेमुळे लाखो मराठी बांधव एकत्र जोडले गेले आहेत. आता महाराष्ट्र शासनाने दिलेल्या पुढाकारामुळे या इमारतीतून माय मराठीच्या संवर्धनासाठी आणि जागतिक स्तरावर प्रचार-प्रसारासाठी भक्कम व्यासपीठ निर्माण होणार आहे.
आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र शासनाकडून ५ कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला असून, लवकरच या इमारतीचे रूपांतर “छत्रपती शिवाजी महाराज वैश्विक मराठी केंद्र (CSMVK)” मध्ये करण्यात येणार आहे.
हा निर्णय परदेशातील मराठी बांधवांसाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण असून, जगभरातील मराठी भाषकांसाठी एकत्र येण्याचे केंद्रबिंदू ठरणार आहे, असे यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी सांगितले.