रत्नागिरी, दि.२९ (जिमाका) :. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी म्हणून सहायक अयुक्त समाज कल्याण कार्यालयात केलेल्या कामामुळे निश्चितच ज्ञात-अज्ञात लाभार्थ्यांना फायदा झाला असेल. त्यांच्या समाधानाची, आशीर्वादाची, पुण्याईची शिदोरी जीवनात निश्चितच उपयोगी ठरेल. स्पर्धा परीक्षा देवून युवा प्रशिक्षणार्थिंनी शासनामध्ये यावे. शंभर दिवस उपक्रमात सहायक आयुक्त समाज कल्याण विभागाने केलेल्या कामगिरीबद्दल जिल्ह्याला मान मिळाला आहे. तो त्यांनी कायमस्वरुपी टिकवून ठेवावा, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी केले.
सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयात अकरा महिने काम केलेल्या युवा प्रशिक्षणार्थिंना प्रशस्तीपत्र देवून निरोप देण्यात आला. यावेळी सहायक आयुक्त दीपक घाटे, गृहपाल रविंद्र कुमठेकर, प्राची विचारे, तालुका समन्वयक अमोल पाटील, गजानन जळके, उमेश अष्टुरे आदी उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात श्री. घाटे म्हणाले, युवा कार्य प्रशिक्षणार्थिंनी या विभागात उत्तम काम केले आहे. इथला अनुभव त्यांना निश्चितच जीवनात उपयोगी ठरेल. तीर्थ दर्शन योजना, वयोश्री योजना या ज्येष्ठांसाठीच्या योजनेमध्ये त्यांचे सहाकार्य, योगदान उल्लेखनीय राहिले आहे. चांगला अभ्यास करुन स्पर्धा परीक्षा द्यावी आणि शासनामध्ये कायमस्वरुपी यावे. नीटनेटकेपणा, स्वच्छता हा केवळ शंभर दिवस शासनाचा उपक्रम न राहता सर्वांनी त्यामध्ये सातत्य ठेवावे.
मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थिंनी स्पर्धा परीक्षा देवून शासनात यावे शंभर दिवस उपक्रमातील कामकाज कायमस्वरुपी टिकवून ठेवावे- जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते
