सांस्कृतिकरत्नदुर्ग किल्ल्यावर सापडले प्राचीन पटखेळाचे कातळशिल्प

रत्नदुर्ग किल्ल्यावर सापडले प्राचीन पटखेळाचे कातळशिल्प

शिवपिंडीसारखी दोन शिल्पेही आढळली

रत्नागिरी:- शहराजवळील रत्नदुर्ग किल्ला येथे आफ्रिकेमधील पारंपरिक पटखेळातील प्रकार मंकाळा खेळाचे कातळशिल्प आढळून आले आहे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या वतीने रत्नदुर्ग किल्यावर सापसफाई करताना दीपगृह परिसरात हे शिल्प आढळून आले. संशोधन अभ्यासक स्नेहल बने यांनी याबाबत माहिती दिली.

हे पटखेळाचे चिन्ह सुमारे साडेतीनशे वर्षापूर्वीचे असून, प्रथमच असे रत्नदुर्ग किल्ल्यात दिसून आले आहे, असा दावा बने यांनी केला आहे. मंकाळा हा आफ्रिकन लोकांमध्ये खेळला जाणारा पटखेळ आहे. कातळावर गोल आकाराचे खड्डे एका रांगेत हव्या असलेल्या पटांची संख्येमध्ये कोरून दोन सवंगड्यांमध्ये हा खेळ खेळला जातो. भारतात अनेक ठिकाणी याला गायचारा, पलंगुळी, अलगुळी आदी नावाने ओळखले जाते. तसेच खेळ सापडलेल्या ठिकाणी शिवपिंडीसारख्या आकाराचेदेखील दोन शिल्प असल्याचे दिसून येत आहे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या कार्यामध्ये रत्नदुर्ग किल्ल्याचे बालेदार तन्मय जाधव व सक्षम शिंदे यांची देखील मोलाची मदत झाली, असे स्नेहल बने यांनी सांगितले.
रत्नदुर्ग किल्ला परिसरातील आढळून आलेले मंकाळा पटखेळ १ फूट ९ इंच लांब असून, त्यावर १२ पट आहेत तर शिवपिंडी १ फूट लांब व ८ इंच रूंद आहेत तसेच या ठिकाणी एक पूर्ण वर्तुळ असून, दुसऱ्या वर्तुळाच्या मध्यभागी रेषा असलेली तीन चिन्हं एकाच कातळावर कोरलेली दिसतात.


आफ्रिकन लोक व्यापारासाठी भारतात
मंकाळा पटखेळाची चिन्हे आढळून आल्याने यातून त्या काळी आफ्रिकन प्रजातीचे लोक भारतात व्यापारासाठी व प्रवासीमार्गाने आले होते का याबाबत अधिक संशोधन करणे गरजेचे असल्याचेही बने यांनी सांगितले.


रत्नदुर्ग किल्ल्याचा इतिहास
रत्‍नदुर्गाची बांधणी फार पूर्वी बहामनी काळात झाली. १६७० साली शिवाजी महाराजांनी हा किल्ला अदिलशहाकडून जिंकून घेतला. धोंडू भास्कर प्रतिनिधी यांनी १७९० साली किल्ल्याची डागडुजी करून याला अधिक मजबुती आणली. १७५५ मधे रत्नदुर्ग आंग्रे यांच्या ताब्यात होता, तर त्यानंतर तो पेशव्यांच्या अंमलाखाली होता. १९५० मधे भगवती मंदिराची दुरुस्ती होऊन १९८९ मध्ये या किल्ल्याची डागडुजी करण्यात आली.

Breaking News