रत्नागिरी ः राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि लांजा-राजापूरचे आमदार किरण सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी (ता. ४) जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या मुलांसाठी विशेष ‘आनंदमेळ्याचे’ आयोजन करण्यात आले होते. सामाजिक कार्याला प्राधान्य देत राबवण्यात आलेल्या या उपक्रमात सहभागी बालकांनी धमाल मस्ती केली. तर ग्रामीण भागातील मुलांसाठी राबवलेल्या या सामाजिक उपक्रमाने त्यांचे पालकही भारावून गेले.
रत्नागिरी तालुक्यातील शिवसेनेचे युवा तालुकाप्रमुख तुषार साळवी यांच्या संकल्पनेतून हा सोहळा पार पडला. मंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत हे नेहमीच समाजकार्यात तत्पर असतात, त्यांच्याच विचारांचा वारसा पुढे नेत साळवी यांनी उपेक्षितांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण निर्माण करण्यासाठी हा मेळावा आयोजित केला होता. येथील मराठा मंडळ सभागृहात पार पडलेल्या या मेळाव्यासाठी जिल्ह्याच्या दुर्गम आणि कानाकोपऱ्यातून सुमारे ७५ मुले आणि ३५ पालक उपस्थित होते. या मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी अक्षय चाळके यांनी विविध मनोरंजक खेळ घेतले. मुलांनी देखील उत्स्फूर्तपणे गाणी म्हटली आणि नृत्याचा आनंद लुटला. या आनंदोत्सवात सर्व मुले रमलेली होती.
या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा शासकीय रुग्णालयाचे डॉ. विकास कुमरे, डॉ. अंकुश शिरसाट, जिल्हा प्रकल्प अधिकारी सचिन पाटील, युवा सेना तालुकाप्रमुख तुषार साळवी, ग्रामपंचायत सदस्य राकेश साळवी, बाबय भाटकर, सुमित नाईक, अमोल पाटणे, डॉ. अंकुश शिरसाट यांच्यासह १० कौन्सिलर कर्मचारी उपस्थित होते. या प्रसंगी तुषार साळवी यांच्या हस्ते उपस्थित मुलांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. तसेच प्रशांत चाळके, अमित तोडकरी, नंदकुमार कुवर, हर्षराज पाटील, अभिजीत घोडके, औदुंबर कळंबटे, रितेश साळवी आदींनी या कार्यक्रमासाठी सहकार्य केले. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
