रत्नागिरी येथे देशातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) आपल्या ५७ व्या गौरवशाली वर्ष निमित्ताने पोलीस मैदानावर आयोजित ‘वंदे मातरम् कोस्टल सायक्लोथॉन–२०२६’ या उपक्रमाचा राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी आज सकाळी शुभारंभ केला.
२८ जानेवारी २०२६ रोजी नवी दिल्ली येथून सुरू झालेली ही सायक्लोथॉन ६,५०० किमी पेक्षा जास्त अंतर पार करत किनारी व सागरी सुरक्षेबाबत जनजागृती या सायक्लोथॉनचा उद्देश किनारी व सागरी सुरक्षेबाबत जनजागृती, राष्ट्रीय एकात्मता, तंदुरुस्ती, पर्यावरण संवर्धन आणि महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्यासह किनारी भागातील नागरिकांमध्ये राष्ट्रीय सुरक्षेचे भान निर्माण करणे, नागरिक व ‘सीआयएसएफ’ यांच्यात समन्वय वाढवणे, तरुण पिढीला अंमली पदार्थांच्या धोक्यांबाबत जागरूक करण्यासाठी या उपक्रमातून प्रयत्न करण्यात येणार आहेत.
सुरुवातील पोलीस बँण्ड पथकाकडून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर दामले हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.
शुभारंभप्रसंगी मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या समवेत रत्नागिरीचे निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पोलीस अधीक्षक नितीन बघाटे, सिनिअर कमांडंट राहुल कुमार, सिनिअर कमांडंट भास्कर कुमार, नगराध्यक्षा शिल्पाताई सुर्वे, कोस्टगार्ड कमाडंट कृष्णकुमार, नगरसेविका स्मितल पावसकर, शिवसेना शहरप्रमुख बिपीन बंदरकर, रत्नागिरी सायकल क्लबचे श्री.देवघर, श्री.सावंत आदींची उपस्थिती होती.
