दापोली: महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार आणि ‘संविधान गौरव महोत्सवा’च्या अनुषंगाने वराडकर बेलोसे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने ‘भारतीय राज्यघटना: हक्क आणि कर्तव्ये’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी एनएसएस कार्यक्रम अधिकारी डॉ. जयश्री गव्हाणे यांनी प्रास्ताविक केले. त्या म्हणाल्या, “भारतीय राज्यघटना ही आपल्या लोकशाही व्यवस्थेचा कणा आहे. प्रत्येक नागरिकाने आपले हक्क आणि कर्तव्ये समजून घेतली पाहिजेत. आजच्या व्याख्यानाच्या माध्यमातून आपण संविधानाची मूलभूत तत्त्वे आणि जबाबदारी जाणून घेणार आहोत.”
यावेळी आनंद फाउंडेशनच्या सौ. माहेश्वरी विचारे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकार, कर्तव्ये आणि नागरिकांना मिळणाऱ्या संरक्षणाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. संविधानाने दिलेल्या जबाबदाऱ्या पाळण्याचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी या विषयावर उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि विविध प्रश्न विचारून संविधान समजून घेण्याची उत्सुकता दाखवली.
कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भारत कऱ्हाड म्हणाले, “राज्यघटनेचा सखोल अभ्यास केल्यास जबाबदार नागरिकत्व जोपासता येते. संविधान हे केवळ कायद्यांचे संकलन नसून, ते आपल्या समाजाला एक दिशा देणारे मार्गदर्शक तत्त्व आहे.”
या व्याख्यानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व अधिक स्पष्ट करण्यात आले. महाविद्यालय अशा शैक्षणिक उपक्रमांतून विद्यार्थी आणि समाजात राज्यघटनेविषयी जागरूकता निर्माण करत आहे.
कार्यक्रमाला एस.वाय. आणि टी.वाय. बी.कॉमचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमाचे आयोजन डॉ. जयश्री गव्हाणे यांनी केले.