दापोली: वराडकर बेलोसे महाविद्यालय, दापोली येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात आणि सन्मानपूर्वक साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी साडेआठ वाजता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भारत कऱ्हाड यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली.
यानंतर डॉ. लक्ष्मण सीताफुले यांच्या मार्गदर्शनाखाली एनसीसी आणि डॉ. जयश्री गव्हाणे व प्रा. गिरमकर यांच्या मार्गदर्शनाखाली एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसरातून दापोली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, कुसाळकर चौक येथे पदयात्रा काढली.
कार्यक्रमाला संस्थेचे सन्माननीय सहकार्यवाह श्री. अनंतराव सणस, तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या जयंतीनिमित्त इतिहास विभागाच्या विद्यार्थिनीने प्रा. सुरेश खरात यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराजांवरील भीतीपत्रक तयार केले होते. या भीतीपत्रकाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. भारत कऱ्हाड यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्राचार्य डॉ. भारत कऱ्हाड यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की,
“छत्रपती शिवाजी महाराज आज असते, तर त्यांनी स्वच्छ प्रशासन, सामाजिक ऐक्य आणि राष्ट्रभक्तीला सर्वोच्च प्राधान्य दिले असते. त्यांचे विचार आणि आदर्श आपण आपल्या दैनंदिन जीवनात अंगीकारले पाहिजेत. त्यांच्या विचारांप्रमाणे नेतृत्व व जबाबदारी पार पाडणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.”
सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. या उत्सवाने विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी वर्गाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची नव्याने प्रेरणा दिली.