रत्नागिरीशिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढलेल्या सर्व निवडणुकांमध्ये...

शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढलेल्या सर्व निवडणुकांमध्ये शिवसेना राज्यातला दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनला

शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढलेल्या सर्व निवडणुकांमध्ये शिवसेना राज्यातला दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनला. आजच्या नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीत महायुतीला दोन तृतीयांश बहुमत मिळालं. आजच्या निकालांतून राज्याच्या नागरी भागांमध्येही एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व सर्वमान्य झालं, असे प्रतिपादन शिवसेना उपनेते व राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले. शिंदेंवर सकाळ संध्याकाळ टीका करणाऱ्या उबाठाला जनतेनं जागा दाखवली, अशी टीका मंत्री सामंत यांनी यावेळी केली. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शिवसेनेला निवडणुकीत मिळालेल्या विजयाबद्दल आज शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी बाळासाहेब भवन येथे जल्लोष केला. मंत्री सामंत म्हणाले की, शिवसेनेचे ५५ नगराध्यक्ष विजयी झाले आहेत. मात्र पुढील दोन दिवसांत सुमारे ७० ते ७२ ठिकाणी शिवसेनेचा नगराध्यक्ष होईल. शिवसेनेचे ८७५ सदस्य निवडून आले. शिवसेनेच्या पदरात महाराष्ट्राच्या जनतेने मोठं यश टाकले आहे. निवडणुकीत वेगवेगळे लढलो असलो तरी मतदारांनी महायुतीच्या बाजूने कौल दिला. त्याबद्दल नागरी भागांमधील मतदारांचे मंत्री सामंत यांनी आभार मानले.

उबाठा २८८ ठिकाणी लढले मात्र जेमतेम ७ ते ८ ठिकाणी त्यांचा निसटता विजय झाला. तिथं महायुतीने व्यवस्थित लक्ष घातलं असते तर हा आकडा ५ वर गेला नसता, असे मंत्री सामंत म्हणाले. पूर्वी शिवसेना वरच्या क्रमांकावर असायची आता उबाठाची कामगिरी खालच्या क्रमांकावरुन सुरु होते, अशी टीका मंत्री सामंत यांनी केली. मुख्यमंत्री असताना नगर परिषदांसाठी केलेलं काम, लाडक्या बहिणींची योजना यामुळे एकनाथ शिंदे सरस ठरले. त्यामुळे आजचे यश हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करणारे आहे, असे मंत्री म्हणाले. आजच्या निकालांनी महापालिका निकालांची नांदी असून सर्व २९ महापालिकांमध्ये महायुतीचे महापौर बनतील, असा विश्वास मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.

Breaking News