रत्नागिरीसावर्डे विद्यालयाची राज्यस्तरीय भरारी

सावर्डे विद्यालयाची राज्यस्तरीय भरारी

सावर्डे विद्यालयाची राज्यस्तरीय भरारी!
पर्यावरणपूरक अभिनव प्रतिकृतीची राज्य हॅकॅथॉनसाठी दमदार निवड
सावर्डे : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे व ‘लीडरशीप फॉर इक्विटी’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय हॅकॅथॉन स्पर्धेत सावर्डे येथील गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. “पर्यावरण पूरक वस्तू” या विषयावर सादर करण्यात आलेल्या अभिनव प्रतिकृतीची राज्यस्तरासाठी निवड झाल्याने रत्नागिरी जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
चिपळूण तालुक्यातील सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्लास्टिकच्या कुंड्यांमुळे वाढणारे प्रदूषण आणि केळीच्या झाडाच्या खोडापासून निर्माण होणारा जैविक कचरा ही दुहेरी समस्या लक्षात घेऊन त्यावर प्रभावी उपाय सुचवला. त्यांनी केळीच्या खोडापासून पर्यावरणपूरक कुंड्या तयार केल्या. या कुंड्यांमध्ये माती व शेणखत/कंपोस्ट भरून रोपे लावण्यात आली. काही दिवसांनी या कुंड्या नैसर्गिकरीत्या कुजून मातीला सेंद्रिय खत मिळते व पर्यावरणाचे संरक्षणही होते – असा दुहेरी लाभ या संकल्पनेतून साधला जात आहे.
या प्रतिकृतीसाठी केळीचे खोड, धारदार सुरी, चमचा, माती, शेणखत/कंपोस्ट तसेच रोपे किंवा बिया यांचा वापर करण्यात आला. गटातील विद्यार्थ्यांनी समन्वय साधत खोड कापणे, ते पोकळ करणे, माती भरणे आणि रोपे लावणे अशी जबाबदारी वाटून घेतली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये नवनिर्मितीची वृत्ती, पर्यावरणाविषयी जागरूकता आणि टाकाऊ वस्तूंपासून उपयुक्त वस्तू तयार करण्याची सवय विकसित झाली.
या स्पर्धेत मिहीर चव्हाण, ओंकार आग्रे आणि अर्णव निर्मळ यांनी उत्कृष्ट सादरीकरण करत परीक्षकांची मने जिंकली. त्यांना श्रेया राजेशिर्के, संचिता कदम, दामिनी महाडिक, सिद्धेश जाधव आणि ज्ञानेश्वर भुवड या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. जिल्हास्तरीय अटल विज्ञान प्रदर्शनात इलेक्ट्रॉनिक विभागात प्रथम क्रमांक प्राप्त करून विद्यालयाने दुहेरी संपादन केले आहे
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष शेखर निकम, विश्वस्त मारुतीराव घाग, चंद्रकांत सुर्वे, शांताराम खानोलकर, आकांक्षा पवार, मानसिंग महाडिक, सचिव महेश महाडिक तसेच विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे व उपप्राचार्य विजय चव्हाण यांनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
सावर्डे विद्यालयाच्या या यशस्वी भरारीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही नावीन्यपूर्ण विचार व संशोधनाची क्षमता असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Breaking News