रत्नागिरीसावर्डे विद्यालयाच्या चिन्मयी शिगवण व पृथ्वी राजभर यांची राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवडचिन्मयीची...

सावर्डे विद्यालयाच्या चिन्मयी शिगवण व पृथ्वी राजभर यांची राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवडचिन्मयीची तिहेरी ‘गोल्डन’ कामगिरी

सावर्डे विद्यालयाच्या चिन्मयी शिगवण व पृथ्वी राजभर यांची राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड
चिन्मयीची तिहेरी ‘गोल्डन’ कामगिरी; पृथ्वीने पटकावला रौप्य क्रमांक
सावर्डे (प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने रविवार, दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी एस. व्ही. जे. सी. टी. क्रीडा संकुल, डेरवण येथे जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स मैदानी स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत १४, १६ व १८ वर्षे वयोगटातील तब्बल ४५४ खेळाडूंनी सहभाग घेतला. या स्पर्धेत सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डेच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली.
विद्यालयातील इयत्ता नववीची विद्यार्थिनी चिन्मयी शिगवण हिने १४ वर्षे वयोगटातील मुलींच्या गटात उत्कृष्ट कामगिरी केली. तिने ६० मीटर धावणे, ६०० मीटर धावणे आणि लांब उडी या तिन्ही क्रीडा प्रकारांत प्रथम क्रमांक पटकावून तिहेरी सुवर्ण यश संपादन केले. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने दि. २७, २८ व ३० ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे.
याच स्पर्धेत विद्यालयाचा पृथ्वी राजभर याने १८ वर्षे वयोगटातील मुलांच्या १००० मीटर धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. आपल्या वेगवान धावण्याच्या जोरावर पृथ्वीनेही राज्यस्तरीय स्पर्धेचे तिकीट मिळविले असून, तो आगामी राज्यस्तरीय स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. आपल्या कामगिरीच्या जोरावर या खेळाडूंनी सह्याद्रीच्या शिरपेचात मानाचा तुरा खवला आहे
दोन्ही खेळाडूंच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व लोकप्रिय आमदार शेखरजी निकम, संस्थेचे कार्याध्यक्ष अनिरुद्धजी निकम व सेक्रेटरी महेशजी महाडिक यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण, पर्यवेक्षक महेश कुलकर्णी, ज्येष्ठ शिक्षक अशोक शितोळे तसेच सर्व शिक्षकवृंदांनी दोन्ही खेळाडूंचे कौतुक केले. या खेळाडूंना क्रीडा मार्गदर्शक दादासाहेब पांढरे, अमृत कडगावे व रोहित गमरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल चिन्मयी शिगवण व पृथ्वी राजभर यांचे सावर्डे परिसरातून अभिनंदन होत असून, राज्यस्तरावरही त्यांनी उत्तम कामगिरी करावी, अशा शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.
यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना ज्येष्ठ शिक्षक अशोक शितोळे व मार्गदर्शक शिक्षक

Breaking News