सावर्डे विद्यालयात इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी गणित विषयाचे विशेष मार्गदर्शन–
👉सावर्डे, सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे येथे इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी गणित विषयाचे विशेष मार्गदर्शन सत्र उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. ज्येष्ठ गणित मार्गदर्शक श्री. अनिल कृष्णाजी सुर्वे यांनी आपल्या प्रभावी, ओघवत्या आणि विद्यार्थीकेंद्रित अध्यापन शैलीत विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असे मार्गदर्शन केले.
श्री. सुर्वे यांनी मुंबई व ठाणे परिसरात सुमारे ३० ते ३५ वर्षे शिष्यवृत्ती परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून अनेक विद्यार्थ्यांना यशाच्या शिखरावर पोहोचविले आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी शिष्यवृत्ती विभाग प्रमुख श्री. साजिद चिकटे यांनी प्रस्ताविकातून श्री. सुर्वे यांच्या प्रदीर्घ शैक्षणिक कार्याचा परिचय करून दिला. त्यानंतर विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. महेश कुलकर्णी यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
मार्गदर्शन सत्रात गणित विषयातील विविध घटक, कठीण संकल्पना, गणिती प्रश्न जलद व अचूक सोडविण्याच्या युक्त्या, वेळेचे प्रभावी नियोजन, अधिक गुण मिळविण्याच्या पद्धती, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण तसेच संभाव्य प्रश्नांचा सराव याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करून त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यावरही विशेष भर देण्यात आला.
श्री. सुर्वे यांच्या विद्यार्थीकेंद्रित अध्यापन पद्धतीमुळे विद्यार्थ्यांनी मार्गदर्शनाचा उत्स्फूर्त प्रतिसाद देत भरभरून लाभ घेतला. हे मार्गदर्शन आगामी शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. तसेच या सत्रामुळे विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाविषयी आवड निर्माण होऊन शिष्यवृत्ती परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन करण्याची प्रेरणा मिळाल्याचे शिक्षकांनी सांगितले.
या मार्गदर्शन सत्रासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. राजेंद्रकुमार वारे, उपमुख्याध्यापक श्री. विजय चव्हाण आणि पर्यवेक्षक श्री. महेश कुलकर्णी यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन शिष्यवृत्ती विभाग प्रमुख श्री. साजिद चिकटे यांनी केले, तर कार्यक्रमाच्या शेवटी श्री. अमित साळवी यांनी उपस्थितांचे आभार मानले. विद्यालयात राबविण्यात येणाऱ्या अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावृद्धीस निश्चितच चालना मिळत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
