सावर्डे – भारतीय संस्कृतीत महिलांना सन्मानाचे स्थान आहे. आजच्या युगात महिला घरापासून ऑफिसपर्यंत जबाबदाऱ्या सांभाळत असताना कोणत्याही क्षेत्रात पुरुषांच्या तुलनेत मागे पडलेले आढळत नाहीत. आपल्या आयुष्यात त्यांच्या या त्यागाचा आणि योगदानाचा मोठा वाटा आहे.
महिलांचा स्वाभिमान आणि आत्मसन्मान जपणे आपले आद्य कर्तव्य आहे, असे प्रतिपादन याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे यांनी केले.
सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात महिला दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य राजेंद्र वारे व पर्यवेक्षक उद्धव तोडकर यांच्या हस्ते करण्यात आले. भारतीय महिलांनी विविध क्षेत्रात साध्य केलेल्या प्रगती विषयी उल्लेखनीय माहिती देणाऱ्या भित्तीपत्रकाचे उद्घाटन विद्यालयाच्या सहाय्यक शिक्षिका शिल्पा राजेशिर्के याच्या शुभहस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने हे सचित्र भित्तीपत्रक श्रेया राजेशिर्के व राधिका थरवळ यांनी तयार केले. विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे , उपप्राचार्य विजय चव्हाण व पर्यवेक्षक उद्धव तोडकर यांनी विद्यालयातील सर्व महिला कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. त्याचबरोबर महिलादिनी वाढदिवस असणाऱ्या विद्यार्थिनींना गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले.विद्यार्थ्यांमधून श्रावणी राठोड, कोमल सावंत,आर्या कदम,साक्षी गोरे ,मनकर्णिका गुडेकर व युवराज रसाळ यांनी महिला दिनाविषयी माहिती सांगितली. अमृता घाग यांनी महिला दिनाचे महत्त्व दैनंदिन जीवनातील विविध दाखल्यांच्या आधारे स्पष्ट केले. या कार्यक्रमाला सर्व महिला कर्मचारी, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.