द एज्युकेशन सोसायटी कडवई संचलित महाराष्ट्र उर्दू हायस्कूल अँन्ड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सचा तालुका स्तरावरील विज्ञान प्रदर्शनात उज्ज्वल यश
संगमेश्वर : दि. ११ डिसेंबर
द एज्युकेशन सोसायटी कडवई संचलित महाराष्ट्र उर्दू हायस्कूल अँन्ड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, कडवईने विज्ञानाच्या पटलावर आपला ठसा उमटवत ५३व्या तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात द्वितीय क्रमांक मिळवत प्रभावी कामगिरी नोंदवली आहे. संगमेश्वर तालुक्यातील कलंबस्ते येथील डाॅ. रश्मिकांत दिपचंद गार्डी माध्यमिक विद्यालय येथे झालेल्या या प्रतिष्ठित विज्ञान प्रदर्शन स्पर्धेत कडवई शाळेच्या विद्यार्थिनीने सादर केलेल्या वैज्ञानिक प्रयोगांना मिळालेली दाद तालुक्यातील विज्ञान प्रेमींसाठी अभिमानाचा विषय ठरली आहे.
या स्पर्धेत कुमारी शर्लीज शाहिद अहमद तुळवे हिने सादर केलेला प्रकल्प विशेष लक्षवेधी ठरला. आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर, समस्येचे सूक्ष्म विश्लेषण, नवनवीन कल्पनांचे वैज्ञानिक रूपांतर आणि प्रयोगातील स्पष्टता यामुळे तिच्या प्रकल्पाला परीक्षकांकडून उत्कृष्ट गुण मिळाले. तिच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाने संपूर्ण उपस्थितांचे व परिक्षकांचे लक्ष वेधले. शर्लीज शाहिद अहमद तुळवेच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला मिळालेली ही दाद तिच्या उज्ज्वल भविष्यातील पहिली पायरी मानली जात आहे.
या यशामागे मार्गदर्शक शिक्षक शेख तौफिक आणि सह-शिक्षिका नर्गिस तुळवे यांचे अथक परिश्रम अधोरेखित करावे लागतील. प्रकल्पाची उभारणी, वस्तुनिष्ठ माहिती संकलन, प्रयोगांचे वैज्ञानिक पडताळणीकरण आणि सादरीकरणाची बांधणी या सर्व टप्प्यांमध्ये त्यांनी विद्यार्थिनीला दिलेले मार्गदर्शन अमूल्य ठरले. त्यांच्या वैज्ञानिक मार्गदर्शनाने विद्यार्थिनीमध्ये संशोधनाची आवड आणि नवनवीन प्रयोग करण्याची उत्सुकता वाढवली आहे.
कडवई शाळेच्या या अभूतपूर्व यशामुळे गावात आनंदाचे वातावरण असून शाळेत उत्साहाची लाट पसरली आहे. शाळेचे मुख्याध्यापक रिजवान कारीगर, सहशिक्षक जावेद दखणी, रिदवान काद्री, इम्रान कापडे, नुजहत बागळकोटे, सुमय्या खान, साक्षी खांबे, कला शिक्षक विशाल धनावडे, तसेच शिक्षकेतर कर्मचारी नदीम मस्तान, दस्तगीर मुल्लाणी आणि प्रशांत कांबळे यांनी विद्यार्थिनीचा तसेच मार्गदर्शक शिक्षकांचा विशेष सन्मान केला आहे.
याशिवाय द कडवई इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक परांजल मोहिते तसेच द एज्युकेशन सोसायटी कडवईचे अध्यक्ष सादीक काजी व सर्व संस्था पदाधिकाऱ्यानी तसेच जमातुल मुस्लीमीन कडवई यांच्या वतीने या यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन केले असून आगामी जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शन स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
मुख्याध्यापक रिजवान कारीगर म्हणाले, “विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण मेहनत आणि जिद्दीने काम केले तर यश निश्चित मिळते. कडवईच्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता आहे. भविष्यात राज्य व राष्ट्रीय स्तरावरही आमच्या विद्यार्थ्यांची चमक अवश्य दिसेल, अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे.”
कडवई शाळेच्या या यशामुळे परिसरात विज्ञान विषयाची जागरूकता वाढली असून इतर विद्यार्थ्यांनाही नवनवीन प्रयोग करण्याची प्रेरणा मिळाली आहे. विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात कडवई गावातील विद्यार्थ्यांच्या सहभागाला या यशामुळे नवी उभारी मिळाली आहे.
