वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी जिल्ह्यात भारतीय प्रख्यात नेमबाज होण्याचा पहिला बहुमान पटकावला…! १६ डिसेंबर ते ५ जानेवारी २०२६ दरम्यान डॉ. कर्णिसिंग शूटिंग रेंज दिल्ली येथे झालेल्या ६८ व्या राष्ट्रीय शॉटगन नेमबाजी स्पर्धेत (68th National Shooting Championship) कार्तिकी मानस देवळेकर व वरा मानस देवळेकर या बहिणींनी आपल्या अचूक नेमबाजीच्या जोरावर "भारतीय प्रख्यात नेमबाज" (Renowned Shooter) हा मानाचा किताब पटकावला आहे. शॉटगन क्ले पिजन डबल ट्रॅप यूथ वुमन (Shotgun Clay Pigeon Double Trap
Youth Women) श्रेणीमध्ये हा किताब मिळवणाऱ्या त्या रत्नागिरी जिल्ह्यातील पहिल्या खेळाडू ठरल्या आहेत. राष्ट्रीय स्तरावर अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या शॉटगन प्रकारात आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करत त्यांनी ही कामगिरी केली आहे. जिल्ह्यातील याआधी कोणत्याही महिला खेळाडूने या श्रेणीत असा बहुमान मिळवला नव्हता, त्यामुळे या यशाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. तसेच रायफल या खेळाचे ११ डिसेंबर ते ३ जानेवारी २०२६ ला ६८ व्या राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धा भोपाळ, मध्यप्रदेश येथे झाल्या. ५० मीटर रायफल प्रोन युथ वूमन या खेळ प्रकारात देखील भारतीय प्रख्यात नेमबाज हा किताब पटकावला. वरा हिने ५९४.२ गुण व कार्तिकी हिने ५९९ गुण प्राप्त करत २०२६ *भारतीय संघ निवड चाचण्यासाठी आपले स्थान निश्चित केले.* त्यांच्या या यशामागे *प्रशिक्षक मोहनीश नंदकुमार हिरवे* यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच केसरी सिंग भाटी सर व जितेंद्र सिंग चौहान सर याचे विशेष मार्गदर्शन त्यांना वेळोवेळी मिळाले. भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करून पदक जिंकण्याचे ध्येय या दोन्ही खेळाडूंनी व्यक्त केले आहे. कार्तिकी व वरा या रत्नागिरीतील पोदार इंटरनॅशनल स्कूल ( Podar International School) येथे शिक्षण घेत असून त्या सिध्दांत रायफल क्लबच्या सक्रिय सदस्या आहेत. त्यांच्या या यशाबद्दल क्लबचे अध्यक्ष विजय खारकर, सचिव प्रशिक्षक राष्ट्रीय प्रख्यात नेमबाज किशन खारके व नगरसेवक सौरभजी मलुष्टे यांनी अभिनंदन व शुभेच्छा दिल्या. त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
