छत्रपती संभाजी नगरमधील औरंगजेबच्या कबरीवरुन झालेल्या वादानंतर १७ मार्च रोजी नागपूरमध्ये दंगल उसळली होती. गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबच्या कबरीवरून राज्यात वाद सुरू आहेत. राज्यभरात हिंदुत्ववादी संघटनांकडून खुलताबादेतील कबर हटवण्यासाठी आंदोलने सुरू आहेत. नागपुरात औरंगजेब कबरीवरून सुरू असलेल्या वादामुळे दंगल झाली. हिंदू मुस्लिम ही आग अजून धगधगू नये यासाठी नागपूर येथे ठिकठिकाणी संचारबंदी लावण्यात आली होती. गेल्या सहा दिवसां पासून नागपूरमध्ये लागू असलेली संचारबंदी अखेर ६ दिवसांनी हटवण्यात आली आहे. गेल्या सोमवारी नागपूर शहरात झालेल्या हिंसाचारानंतर ११ पोलिस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली होती. ती आता उठवण्यात आली आहे. संचारबंदी उठवल्यानंतर नागपूर पोलिसांनी हिंसाग्रस्त भागात रुटमार्चही काढला. गणेशपेठ, कोतवाली , तहसील आणि यशोधरा नगर या भागात संचारबंदी उठवताच बाजारपेठा उघडायला सुरवात झाली.
संचारबंदी उठल्यानंतर नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांनी हिंसाचाराचे केंद्र राहिलेल्या भालदारपुरा या भागाची पाहणी केली.यावेळी माध्यमांशी बोलतांना नागपूरची स्थिती नियंत्रणात असून परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर संचार बंदी उठवण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं. पुढील काळात सोशल मीडियाच्या वापरावर पोलिसांची कडक नजर राहणार असल्याचे देखील पोलिस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांनी सांगितलं.
