रत्नागिरीअदाणी स्मार्ट मीटर सक्तीविरोधात रत्नागिरी शहर काँग्रेस आक्रमक

अदाणी स्मार्ट मीटर सक्तीविरोधात रत्नागिरी शहर काँग्रेस आक्रमक

अदाणी स्मार्ट मीटर सक्तीविरोधात रत्नागिरी शहर काँग्रेस आक्रमक

महावितरण अधिकाऱ्यांना धरले धारेवर

रत्नागिरी: रत्नागिरी शहर आणि परिसरात महावितरणकडून बसविण्यात येत असलेल्या अदाणी स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात आता राजकीय वातावरण तापू लागले आहे. ग्राहकांच्या संमतीशिवाय मीटर बसवणे, डेटा सुरक्षिततेचा अभाव आणि तक्रार निवारण यंत्रणेतील त्रुटींबाबत रत्नागिरी शहर काँग्रेस कमिटीने महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देऊन लेखी स्पष्टीकरणाची मागणी केली आहे.

काँग्रेसने दिलेल्या निवेदनात प्रामुख्याने ‘डेटा प्रायव्हसी’चा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. स्मार्ट मीटरद्वारे संकलित होणारा ग्राहकांच्या वीज वापराचा खासगी डेटा नेमका कोणाकडे साठवला जातो? या डेटावर अदाणी कंपनीचा किती अधिकार आहे? आणि ‘डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ॲक्ट २०२३’ नुसार ग्राहकांची पूर्वसंमती घेतली गेली आहे का? असे सवाल शहराध्यक्ष अशपाक काद्री यांनी प्रशासनाला विचारले आहेत.

शहरातील तसेच तालुक्यातील अनेक नागरिकांनी तक्रार केली आहे की, कोणतीही पूर्वसूचना न देता जुने मीटर काढून नवीन स्मार्ट मीटर बसवले जात आहेत. ‘इलेक्ट्रिसिटी ॲक्ट २००३’ नुसार ग्राहकांना मीटरबाबत माहिती मिळवण्याचा अधिकार आहे, मात्र महावितरणकडून या नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

स्मार्ट मीटर बसवल्यानंतर बिलात होणारी वाढ किंवा तांत्रिक बिघाडाबाबत तक्रार करायला गेल्यावर महावितरण आणि अदाणी कंपनी एकमेकांकडे बोट दाखवतात, असा अनुभव नागरिकांना येत आहे. यामुळे सर्वसामान्यांची पिळवणूक होत असून महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या (MERC) नियमावलीनुसार तक्रारींचे निवारण का होत नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
मीटर बसवण्यापूर्वी ग्राहकांना रीतसर लेखी पूर्वसूचना दिली गेली का? असा सवाल काँग्रेसकडून उपस्थित करण्यात आला आहे. ग्राहकांच्या खासगी डेटाच्या सुरक्षिततेबाबत महावितरणचे अधिकृत धोरण काय? तसेच महिन्याभरात स्मार्ट मीटरबाबत किती तक्रारी आल्या आणि त्यापैकी किती सुटल्या? महावितरण आणि अदाणी कंपनी यांच्यातील कराराचे स्वरूप काय आहे? असे अनेक प्रश्न काँग्रेसकडून उपस्थित करण्यात आले आहेत.

“आम्ही महावितरणच्या विरोधात नाही, तर नागरिकांच्या हक्कांच्या बाजूने आहोत. जर १५ दिवसांत या मुद्द्यांवर लेखी समाधानकारक उत्तर मिळाले नाही, तर आम्ही महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग आणि ग्राहक न्यायालयात धाव घेऊ,” असा इशारा रत्नागिरी शहर काँग्रेस कमिटीने दिला आहे. यावेळी शहराध्यक्ष अशफाक काद्री, कौशल फाळके, नंदन गांगण, इरफान होडेकर, अशफाक झारी आणि पांडू कवितके उपस्थित होते.

Breaking News