विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी अशी प्रदर्शने उपयुक्त – अशोक शितोळे
सावर्डे : विज्ञान म्हणजे केवळ प्रयोगशाळेतील रसायने, सूत्रे किंवा यंत्र नव्हे; विज्ञान म्हणजे जिज्ञासा, शोध, प्रयोग आणि नवसर्जनाची वृत्ती आहे. “का?” आणि “कसे?” हे प्रश्न ज्या दिवशी विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होतात, त्या दिवशी विज्ञानाची खरी सुरुवात होते, असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे अशोक शितोळे यांनी आली पब्लिक स्कूल सावर्डे येथे आयोजित विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी केले.
या विज्ञान प्रदर्शनात एकूण २१ उपयुक्त प्रतिकृतींची आकर्षक मांडणी करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी सादर केलेले विविध मॉडेल्स, प्रकल्प आणि सादरीकरणे पाहून शाळेतील विद्यार्थी फक्त पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित नसून प्रत्यक्ष प्रयोगातून ज्ञान मिळवत असल्याचे स्पष्ट झाले.
भारत विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात अवकाश संशोधन, संरक्षण, वैद्यकीय संशोधन तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या क्षेत्रांत मोठी झेप घेत असून उद्याचे शास्त्रज्ञ याच व्यासपीठावरून घडतील, असा विश्वासही अशोक शितोळे यांनी व्यक्त केला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी अपयशाला घाबरू नये, प्रयोगातील चुका हीच यशाची पहिली पायरी असते, असा मोलाचा संदेश दिला.
🏆 स्पर्धेतील मानकरी विद्यार्थी
🔹 छोटा गट (इयत्ता चौथी ते सहावी)
प्रथम क्रमांक : मोहम्मद भोंबल, अमर खान, अरजान कापडी – ऑटोमॅटिक स्ट्रीट लाईट
द्वितीय क्रमांक : सुमेरा पटेल – वॉटर सायकल
तृतीय क्रमांक : आरमान खान व अबूजल राईल – उपयुक्त प्रतिकृती
🔹 मोठा गट
प्रथम क्रमांक : शबनम खातून – कचरा व्यवस्थापन
द्वितीय व तृतीय क्रमांक : मुआज चिकटे व असूबा गुहागरकर यांच्या प्रतिकृती
या सर्व प्रतिकृतींचे परीक्षण रईस मोडक, इमदाद चिकटे व राहील गोलंदाज यांनी केले.
कार्यक्रमास बरकत तांबू, इमदाद चिकटे, पंचायत समिती सदस्य शौकत माखझनकर, लोकल कमिटी सदस्य अब्दुल कादीर भोबल, इस्लाम उद्दीन भोंबल तसेच मुख्याध्यापिका वसीमा चिकटे उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
या विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होऊन त्यांच्या उज्ज्वल भविष्यास निश्चितच दिशा मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
