रत्नागिरीअसुर्डे विद्यालयात मराठी राजभाषा दिन साजरा-

असुर्डे विद्यालयात मराठी राजभाषा दिन साजरा-

सह्याद्रि शिक्षण संस्थेचे वसंत शंकर देसाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, असुर्डे -आंबतखोल या विद्यालयात कविवर्य कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिन मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून विद्यालयात कविता गायन, कविता वाचन, कथाकथन, पद्य वाचन,शिक्षक व विद्यार्थी यांची भाषणे असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

यावेळी बोलताना विद्यालयाचे मुख्याध्यापक अमर भाट यांनी मराठी ही आपली मातृभाषा आहे. सर्वांनी आपली बोलीभाषा आणि प्रमाण भाषा यांचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे.आपली भाषा विकसित करण्यासाठी थोर मराठी साहित्यिकांनी योगदान दिले आहे. त्यामध्ये ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त थोर मराठी साहित्यिक नटसम्राटकार,विशाखाकार वि वा शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचा सिंहाचा वाटा आहे म्हणून त्यांचा जन्मदिन 27 फेब्रुवारी हा दिवस शासनाने मराठी राजभाषा दिन साजरा करण्यास सुरुवात केली.

यावेळी बोलताना उदयकुमार पाटील यांनी वि वा शिरवाडकर यांच्या संपूर्ण जीवन कार्यावर प्रकाश टाकला. त्यांचे लेखन व साहित्य याविषयी सखोल माहिती सांगितली. त्यांनी रचलेल्या कविता यांचे गायन केले व लिहिलेली नाटके यातील अप्रतिम संवाद सादर केले. टू बी ऑर नॉट टू बी या संवाद कौशल्यावर प्रेक्षकांनी चांगलीच दात दिली.यावेळी त्यांनी मराठी भाषेचे महत्त्व सांगताना मराठीची निर्मिती त्यानंतर मराठी भाषेचा उत्कर्ष,करण्यासाठी थोर साहित्यिकांनी केलेले प्रयत्न, छत्रपती शिवरायांनी मराठी भाषा शब्दकोश तयार करण्यासाठी केलेले प्रयत्न, संत महांतांनी केलेले प्रयत्न याविषयी सखोल माहिती सांगितली.

विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी रोहिणी शिवाजी लाड हिने केलेल्या भाषणाने सर्व श्रोत्यांची मने जिंकली. या कार्यक्रमावेळी विद्यार्थ्यांनी केलेली भाषणे, सांगितलेल्या कथा, वाचलेले उतारे, गायलेल्या माझी मराठी, माय, माय मराठी, गे मायभूमी इ. कविता अत्यंत श्रवणीय होत्या.या कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.अश्मी कोचीरकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर समीक्षा सुर्वे यांनी सर्वांचे आभार मानले.

Breaking News