रत्नागिरीआजीची भाजी रानभाजीभुईआवळा आणि उंबर

आजीची भाजी रानभाजीभुईआवळा आणि उंबर

आजी आणि तिची रानभाजी ही सध्याच्या जीवनापासून दूरदूर जाताना दिसत आहे. अनुभवाची गोष्ट सांगून नातवांचे जीवन समृध्द करणारी घरातली आजी, तिचा औषधी गुणकारी बटवा आणि मानवी आरोग्य समृध्द करणारी तिची रानभाजी या नव्या पिढीपासून काळाच्या ओघात हरवत जात आहे. अशा रानभाज्यांची ओळख करुन देणारी आजीची भाजी रानभाजी ही महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा रत्नागिरी यांच्या सौजन्याने जिल्हा माहिती कार्यालयामार्फत सुरु केलेल्या या मालिकेत आजची रानभाजी आहे भुईआवळा आणि उंबर..
भुईआवळा वनस्पतीत फायलॅनथीन नावाचे द्रव्य आहे. काविळ झाल्यास भुईआवळा वाटून दुधाबरोबर सकाळ संध्याकाळ देतात. यकृतवृध्दी व प्लीहावृध्दी कमी करण्यास याचा वापर करतात. या वनस्पतीमुळे लघवीचे प्रमाण वाढते व दाह कमी होतो. लघवी कमी होणे, मूतखडा, जंतूसंसर्ग आदी विकारांतही या भाजीच्या सेवनामुळे चांगला गुण येतो. भुईआवळ्याची भाजी आंबट असून, या वनस्पतीचा उपयोग विषाणूजन्य तापात केला जातो. कावीळमध्ये या भाजीचा चांगला उपयोग असल्याचे दिसून आले आहे. रक्तदाबवृध्दी, चक्कर येणे या आजारातही ही भाजी खाल्ल्याने सुधारणा आढळून येते.
कढईत तेल घेऊन त्यामध्ये फोडणीसाठी लसूण परतावा. मोहरी, हिंग घालून फोडणी घ्यावी. आधी स्वच्छ केलेली भाजी व अर्धी वाटी तूर, मसूर किंवा मुगडाळ कुकरमध्ये शिजवून घोटून घ्यावी. त्यात डाळीचे पिठ लावावे. नंतर ती भाजी फोडणीत घालावी. हिरव्या मिरचीची पेस्ट, शेंगदाण्याचे कुट, थोडासा गुळ आणि चवीपुरते मीठ घालून भाजी शिजवावी.
दुसऱ्या कृतीमध्ये स्वच्छ धुवून भाजी बारीक करुन घ्यावी. तेलात कांदा, लसूण, हिरवी मिरची परतून घ्यावी. चिरलेली भाजी घालून चांगली परतून घ्यावी. त्यामध्ये चवीपुरते मीठ घालावे.
उंबर
उंबराला औदुंबर असे म्हटले जाते. याचे फूल दिसत नसले तरी उंबरामध्येच फुलाचे सर्व अवयव दिसतात. राजा परांजपे यांच्या ‘जगाच्या पाठीवर’ चित्रपटामध्ये ‘उंबरातले किडे मकोडे, उंबरी करती लिला ! जग हे बंदीशाळा’ असे गीतात वर्णन आले आहे. या झाडाच्या सुकलेल्या काड्या होमहवनात समिधा म्हणून अर्पण करतात. या झाडाची पाने वाटून विंचू चावल्यावर लावल्यास वेदना कमी होतात. गालगुंडावर या झाडाच्या चिकाचा लेप लावल्यास त्याची तीव्रता कमी होते. या झाडाच्या पानांवरील फोडांचा उपयोग वांतीवर केला जातो. गोवर, उचकी, अतिसार, उन्हाळी मधुमेह आदी रोगांवर उंबराची फळे, फुले व पाने उपयुक्त आहेत. – प्रशांत कुसुम आनंदराव सातपुते जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी

Breaking News

‘सिंदूर रक्तदान महायात्रा’ ही भारतीय सैनिकांना रक्तदान करणारा देशातील पहिला उपक्रम-

जम्मू येथील एम्स रुग्णालयात सांगलीवरून आलेल्या सिंदूर रक्तदान महायात्रेचा...

रत्नागिरी जिल्ह्यातील पाऊसदिनांक – 11/08/2025

१) मंडणगड - 12.25 मिमी२) खेड - 21.42 मिमी३)...