आरोग्य व्यवस्थेला बळकटी : पुणे नॉलेज क्लस्टर व जिल्हा हिवताप कार्यालय, रत्नागिरी यांचा संयुक्त उपक्रम; ३१० आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
रत्नागिरी : स्थानिक (इंडिजिनस) हिवताप प्रकरणे शून्यावर आणण्याच्या भारत सरकारच्या २०३० पर्यंतच्या राष्ट्रीय उद्दिष्टाच्या अनुषंगाने पुणे नॉलेज क्लस्टर (PKC) आणि जिल्हा हिवताप कार्यालय, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सक्षम’ या कीटकजन्य रोगांवरील प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. रत्नागिरी व चिपळूण येथे आयोजित या कार्यशाळेत जिल्ह्यातील एकूण ३१० बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (MPWs) यांनी सहभाग नोंदविला.
या कार्यशाळेत डेंग्यू, हिवताप आणि चिकनगुनिया यांसारख्या कीटकजन्य रोगांचे निदान, सर्वेक्षण प्रणाली, डासांचे जीवनचक्र व जैववैशिष्ट्ये, हवामान व पर्यावरणीय बदलांचा रोगप्रसारावर होणारा परिणाम तसेच अचूक माहिती संकलनाचे महत्त्व या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तज्ज्ञ व्याख्याने आणि कृतीआधारित उपक्रमांच्या माध्यमातून आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष कामात उपयोगी ठरणारे प्रशिक्षण देण्यात आले.
रत्नागिरी येथे झालेल्या कार्यशाळेला जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोष यादव उपस्थित होते, तर चिपळूण येथील कार्यशाळेला तालुका आरोग्य अधिकारी डॉ ज्योती यादव यांनी उपस्थिती लावली. या प्रसंगी तज्ज्ञ मार्गदर्शन डॉ. मुरलीधर तांबे (बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे), डॉ. सचिन धांडे (CHRI-PATH) आणि श्री. सुनील देशमुख (CRS, पुणे) यांनी केले.
या कार्यशाळेचे नियोजन पुणे नॉलेज क्लस्टरच्या चिन्मय स्वामी, श्रेयस दिलीप खाडे, शीतल नागपूरे आणि जान्हवी अग्रवाल यांच्या टीमने केले. जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने त्यांच्या नियोजनबद्ध आणि प्रभावी कार्याचे कौतुक केले.
अशा प्रकारच्या प्रशिक्षण उपक्रमांमुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम होत असून, हिवताप निर्मूलनाच्या राष्ट्रीय मोहिमेला गती मिळण्यास मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. - जिल्हा हिवताप अधिकारी, रत्नागिरी
आरोग्य व्यवस्थेला बळकटी : पुणे नॉलेज क्लस्टर व जिल्हा हिवताप कार्यालय, रत्नागिरी यांचा संयुक्त उपक्रम; ३१० आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
