रत्नागिरी येथील पारस दर्शन सोसायटी च्या प्रांगणात खेळलेला आणि रत्नागिरी ते इंग्लंड हा प्रवास करत इंग्लंडमधील कौंटी स्पर्धेत फलंदाजी व गोलंदाजीमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या अविराज गावडे याचा, पारस दर्शन सहकारी संस्थेच्या सभेत कुटुंबियांसमवेत संस्थेचे अध्यक्ष गजानन पाटील यांच्या संकल्पनेतून घरातील सन्मान करण्यात आला.
अविराज हा पारस दर्शन सोसायटीत लहानाचा मोठा झाला. याच संस्थेच्या प्रांगणात सराव करताना अनेकदा सोसायटीच्या लोकांचा अविराज याला ओरडा खावा लागला. मात्र बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, त्याप्रमाणे अनेकांनी त्याला प्रेरणा दिली. आणि हाच अविराज रत्नागिरी जिल्ह्यातुन खेळताना आपल्या अंगभूत कौशल्याच्या जोरावर पुण्यात खेळण्याकडे वळला. त्याच्या तेथील खेळाचे परीक्षण इंग्लंडमधील कौंटी लीगच्या मान्यवरांनी केले. त्याच्यातील कौशल्याला हेरून, त्याला थेट कौंटी लीगमध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्यानंतर मात्र अविराजने थेट इंग्लंडमधील अत्यंत प्रतिष्ठेच्या कौंटी स्पर्धेत अत्यंत चमकदार कामगिरी केली आहे. एवढेच नव्हे तर इंग्लंडमधील याच कौंटी स्पर्धेत अविराज गावडेने लक्षणीय कामगिरी करत, शेवटच्या सामन्यात शतकी खेळी केली होती. या स्पर्धेतील एकूण दहा सामन्यांपैकी त्याने तब्बल सहावेळा मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवला. यासाठी त्याने ३६० धावा व ३१ विकेट घेत अष्टपैलू कामगिरी बजावली. तसेच मिडलसेक्स कंट्री लीगचा बेस्ट बॉलर हा पुरस्कार सुद्धा मिळवला आहे.
एका सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या अविराज गावडे याने मिळविलेल्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्याच्यावर कौतुक होत असताना, ज्या सोसायटीच्या प्रांगणात त्याचा खेळ सुरू झाला त्याच सोसायटीने त्याचा व त्याच्या कुटुंबीयांचा सन्मान करत हा सन्मान आपल्या सोसायटीचा आणि समस्त रत्नागिरीचा असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
अविराज गावडे हा येणाऱ्या पिढीसाठी आदर्शवत काम करत असून त्याच्या याच कार्याची रत्नागिरी मधील क्रीडा क्षेत्रातील सर्वानी एकत्र येऊन त्याचा सन्मान करून त्याची उमेद वाढवत त्याला प्रेरणा देण्याची आवश्यकता असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.
या सत्कारावेळी पारसदर्शन सोसायटीचे अध्यक्ष गजानन पाटील, सदस्य मिलिंद सावंत, अविराज गावडे याचे वडील अनिल गावडे, सुंदर शेट्टी, माधव काणे, प्रकाश साळवी, समीर इंदुलकर, सतीश मुळ्ये, दत्तात्रय खातू, जीवन वेल्हाळ, कविता अळवणी, विद्या साळवी,श्रेया इंदुलकर, सौ. महानवर यासह पारस दर्शन सहकारी संस्थेचे अन्य सदस्य उपस्थित होते.
