रत्नागिरीईगल तायक्वांदोकडून पटवर्धन प्रशालेत स्वसंरक्षणाचे धडे…

ईगल तायक्वांदोकडून पटवर्धन प्रशालेत स्वसंरक्षणाचे धडे…

रत्नागिरी – स्वसंरक्षणाचे महत्व लक्षात घेत छोट्या छोट्या क्लुप्त्या वापरून केवळ हात आणि पायांचा वापर करत स्वसंरक्षण कसे करावे याचे प्रात्यक्षिक ईगल तायक्वांदो अकॅडमीकडून देण्यात आले. शहरातील भारत शिक्षण मंडळाच्या पटवर्धन प्रशालेत हे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते.
सखी सावित्री योजनेअंतर्गत मुलांना स्वसंरक्षणाबाबत प्रात्यक्षिक देण्यासाठी ईगल तायक्वांदोच्या प्रशिक्षक संकेता संदेश सावंत आणि सई संदेश सावंत यांना आमंत्रित करण्यात आले होते. अचानक एखादे संकट आपल्यावर आल्यानंतर कोणतेही शस्त्र हातात नसताना स्वतःच संरक्षण केवळ हात, पाय आणि छोटीशी क्लुप्ती वापरून कसे करावे याची माहिती आणि प्रात्यक्षिके यावेळी उपस्थित विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना देण्यात आली. या प्रात्यक्षिकांमध्ये विद्यार्थ्यांनाही सहभागी करून घेण्यात आले. स्वसंरक्षणाच्या प्रात्यक्षिकांचा हा कार्यक्रम प्रशालेच्या ठाकूर सभागृहामध्ये घेण्यात आला.
शहरातील अभ्युदय नगर, नाचणे रोड येथे ईगल तायक्वांदो अकॅडमीकडून तायक्वांदो या खेळाचे प्रशिक्षण दिले जाते. संकेता आणि सई संदेश सावंत या दोन्ही पटवर्धन प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी असून गेली सुमारे बारा वर्ष त्या या क्रीडा क्षेत्रात विविध स्तरावर यश मिळवत आहेत. या प्रात्यक्षिकांच्या वेळी संकटकाळात स्वतःचं रक्षण करण्यासाठी शक्तीचा नाही तर युक्तीचा वापर कसा करावा याचं योग्य तंत्र संकेता आणि सई सावंत यांनी दाखवलं.
यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती घाटविलकर मॅडम तसंच शिक्षकवर्ग उपस्थित होता.

Breaking News