रत्नागिरी, (जिमाका):- जिल्ह्यातील स्थायीरित्या लघु उद्योग नोंदणी झालेल्या उद्योग घटकांकडून उत्कृष्ट लघु उद्योजकास जिल्हा पुरस्कार 2024-25 या आर्थिक वर्षासाठी अर्ज मागविण्यात येत असून, लघु व- सुक्ष्म उद्योग घटकांनी दि. 4 मार्चपूर्वी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अ. अ. आजगेकर यांनी केले आहे.
जिल्हा पुरस्कार योजनेअंतर्गत लघु उद्योग घटकांमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीकोणातून तसेच उत्पादनाचा दर्जा उंचावण्यासाठी व लघु उद्योजकांना उत्तेजन देण्यासाठी पात्र लघु उद्योगांना प्रत्येक जिल्हयात जिल्हा पुरस्कार देण्याची योजना शासनस्तरावर राबविण्यात येते. प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही योजना त्या-त्या जिल्हा उद्योग केंद्रामार्फत राबविण्यात येते.
या योजनेत सहभागी होण्यासाठी लघु उद्योगांची नोंदणी प्रमाणपत्र/उद्यम प्रमाणपत्र आवश्यक, मागील तीन वर्षात सलग उत्पादन व किमान निव्वळ नफा करत असणारे लघुउद्योग, उद्योग घटक वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा, यापूर्वी राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय किंवा जिल्हा पुरस्कार मिळालेला नसावा या अटींची पूर्तता करणारे लघुउद्योग योजनेत भाग घेण्यासाठी पात्र असतील. तसेच याकामी विहित नमुन्यात पात्र घटकाकडून मागील ३ वर्षाची वर्षानिहाय माहिती अपेक्षित राहील .
हे पुरस्कार प्रत्येक कॅलेंडर वर्षात दोन पात्र उद्योग घटकांना देण्यात येतात. प्रथम पुरस्कारास रुपये १५ हजार रोख, गौरव चिन्ह व शाल श्रीफळाने सन्मानीत तर द्वितीय पुरस्कार- रुपये १० हजार रोख, गौरव चिन्ह व शाल श्रीफळाने सन्मानीत असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
तरी पात्र उद्योग घटकाने विहित नमुन्यातील अर्ज व त्यासोबत आवश्यक कागदपत्रासह दि. ०४ मार्च २०२६ पूर्वी जिल्हा उद्योग केंद्र, रत्नागिरी (औद्योगिक विकास महामंडळ, एमआयडीसी इमारत), जे.के. फाईल्स, बँक ऑफ इंडियाच्या शेजारी) या कार्यालयास सादर करावे. विहित नमुन्यातील अर्ज व अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग केंद्र, रत्नागिरी या कार्यालयाकडे संपर्क साधावा.
