रत्नागिरीएसआयआर २०२६ : प्रारूप मतदार यादीत नाव नसल्यास पात्र नागरिकांनी विहित प्रक्रियेनुसार...

एसआयआर २०२६ : प्रारूप मतदार यादीत नाव नसल्यास पात्र नागरिकांनी विहित प्रक्रियेनुसार नोंदणी करावी-विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल

एसआयआर २०२६ : प्रारूप मतदार यादीत नाव नसल्यास पात्र नागरिकांनी विहित प्रक्रियेनुसार नोंदणी करावी-विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल–

दावे व हरकती दाखल करण्याची मुदत १२ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ; १० नोव्हेंबरपर्यंत दावे-हरकती व नोटिसांवरील कार्यवाही पूर्ण करण्याचे कोकण विभागाचे नियोजन–

👉नवी मुंबई– विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) २०२६ अंतर्गत कोकण विभागातील मुंबई शहर,मुंबई उपनगर ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांची प्रारूप मतदार यादी दि. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रारूप मतदार यादीत आपले नाव आहे किंवा नाही, याची सर्व नागरिकांनी पडताळणी करावी. नाव आढळून न आल्यास पात्र नागरिकांनी विहित प्रक्रियेनुसार आवश्यक अर्ज व कागदपत्रे सादर करून आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करून घ्यावे, असे आवाहन विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक रुबल अग्रवाल यांनी केले आहे.

प्रारूप मतदार यादीत नाव नसणे म्हणजे संबंधित पात्र नागरिक मतदानापासून वंचित राहणार असा अर्थ होत नाही. पात्र नागरिकांना आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याची संधी उपलब्ध आहे. भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासाठी दावे व हरकती दाखल करण्याची मुदत दि. १२ ऑक्टोबर २०२६ पर्यंत वाढविली आहे. तसेच प्राप्त दावे, हरकती आणि नोटिसांवरील कार्यवाही पूर्ण करण्याची मुदत दि. १० नोव्हेंबर २०२६ पर्यंत असल्याची माहितीही त्यांनी दिली. याकरिता आता निवडणूक आयोगामार्फत नेमलेले बी.एल.ओ. (BLO) घरोघरी जाऊन पात्र मतदारांची पडताळणी करणार आहेत.

आपले नाव कुठे शोधावे?
नागरिकांनी भारत निवडणूक आयोगाच्या मतदार सेवा पोर्टल electoralsearch.eci.gov.in तसेच voters.eci.gov.in किंवा ECINET APP वर आपले नाव तपासावे. मतदारांनी आपल्या जन्मतारखेनुसार,ईपिक क्रमांकानुसार किंवा मोबाईल क्रमांक टाकून ओटीपी बेसड नाव शोधावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र (ceo.maharashtra.gov.in) तसेच संबंधित जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध मतदार यादीची पडताळणी करता येईल. याकरिता जिल्ह्यांची संकेतस्थळे याप्रमाणे आहेत. https://mumbaicity.gov.in, https://mumbaisuburban.gov.in. https://thane.nic.in, https://raigad.gov.in, https://palghar.gov.in, https://ratnagiri.gov.in, https://sindhudurg.nic.in, आपल्या मतदान केंद्रावरील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO), मतदार नोंदणी अधिकारी (ERO) अथवा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (AERO) यांच्या कार्यालयाशी संपर्क साधूनही मतदार यादीबाबत माहिती घेता येईल. याशिवाय १९५० या टोल फ्री हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधता येईल.

प्रारूप यादीत नाव नसल्यास काय करावे?
मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना क्रमांक ६, स्वतंत्र घोषणापत्र (Declaration) आणि आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन voters.eci.gov.in / Voter Helpline App किंवा संबंधित BLO/ERO/AERO कार्यालयामार्फत अर्ज सादर करावा. इतर राज्यातून स्थलांतरित झालेल्या मतदारांनीही नमुना क्रमांक ६ व स्वतंत्र घोषणापत्रासह आवश्यक कागदपत्रे सादर करावीत. यापूर्वीच्या एसआयआरमध्ये स्वतःची किंवा कुटुंबातील सदस्यांची मतदार म्हणून नोंदणी झाली असल्यास त्याबाबतची मॅपिंग (Mapping) माहिती नमूद करावी. ही माहिती उपलब्ध नसल्यास आयोगाने विहित केलेल्या कागदपत्रांपैकी आवश्यक पुरावा सादर करावा. मात्र संबंधित नागरिकाकडे त्या कागदपत्रांपैकी कोणतेही कागदपत्र उपलब्ध नसल्यास केवळ त्या कारणास्तव अर्ज नाकारला जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.

मतदार यादीतील नोंदीमध्ये दुरुस्ती करावयाची असल्यास नमुना क्रमांक ८, तर एखाद्या मतदाराच्या नोंदीवर हरकत घ्यावयाची असल्यास किंवा आपले नाव मतदार यादीतून वगळण्याकरिता नमुना क्रमांक ७ वापरावा. अर्ज सादर केल्यानंतर त्याची स्वतंत्र पोहोचपावती जतन करावी.

नवमतदारांनीही नोंदणी करावी
दि. १ ऑक्टोबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी १८ वर्षे पूर्ण होणारे पात्र युवकांना नमुना क्रमांक ६ भरून मतदार म्हणून नाव नोंदणी करता येईल. त्यामुळे पात्र नवमतदारांनीही विहित प्रक्रियेचा लाभ घेऊन आपले नाव मतदार यादीत नोंदवून घ्यावे.

नोटीस प्राप्त झालेल्या मतदारांसाठी घरपोच कागदपत्र संकलन

विशेष सखोल पुनरिक्षणादरम्यान जुळवणी न झालेले (Unmapped) किंवा तार्किक विसंगती (anamoly) असलेले मतदार म्हणून नोटीस प्राप्त झालेल्या नागरिकांसाठीही स्वतंत्र कार्यवाही करण्यात येणार आहे. संबंधित BLO त्यांच्या घरी भेट देऊन आवश्यक कागदपत्रे घेऊन ती ECINet वर अपलोड करतील. अशा मतदारांना ERO/AERO कार्यालयात सुनावणीसाठी बोलावले जाणार नाही.

केवळ अपवादात्मक परिस्थितीत ERO यांच्या निर्णयानुसार शक्यतो ऑनलाइन सुनावणी घेता येईल. आवश्यक असल्यास मतदाराच्या कुटुंबातील कोणत्याही प्रौढ सदस्यास संबंधित मतदाराने अधिकृत केल्यास त्याच्या वतीने सुनावणीस उपस्थित राहता येईल. या पद्धतीमुळे नोटीस प्राप्त झालेल्या मतदारांना कागदपत्रे सादर करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे.

मदत कक्ष व विशेष शिबिरांची सुविधा
सर्व मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयांमध्ये दावे व हरकती स्वीकारण्याच्या कालावधीत विशेष मदत कक्ष कार्यरत आहेत. येथे नागरिकांना ऑनलाइन तसेच ऑफलाइन अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शन व सहकार्य मिळणार आहे. तसेच दिव्यांग, आर्थिकदृष्ट्या मागास व बेघर नागरिकांसाठी आवश्यकतेनुसार मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. तसेच दि. ३, ४ व दि. १० आणि ११ ऑक्टोबर, २०२६ ऑक्टोबर, २०२६ शनिवार व रविवार रोजी सर्व मतदान केंद्रावर विशेष नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी उपलब्ध सुविधांचा लाभ घेऊन मतदार यादीतील आपली नोंद तपासावी व आवश्यक ती कार्यवाही करावी. कोकण विभागातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी यांचे संपर्क https://divcomkonkan.gov.in/en/document/special-intensive-revision-sir-2026-help-desk-contact-numbers/ येथून प्राप्त करु शकता.

कोकण विभागातील सर्व पात्र नागरिकांनी आपले नाव प्रारूप मतदार यादीत तपासावे. नाव नसल्यास दि. १२ ऑक्टोबर २०२६ पूर्वी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून मतदार यादीत नाव समाविष्ट करून घ्यावे. मतदार यादीतील नोंदीची दुरुस्ती किंवा एखाद्या नोंदीबाबत हरकत असल्यास त्यासाठीही विहित नमुन्याचा वापर करावा. कोणताही पात्र नागरिक मतदार यादीतून वंचित राहू नये, हा या मोहिमेचा उद्देश असून नागरिकांनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक रुबल अग्रवाल यांनी केले आहे.


Breaking News

रत्नागिरी जिल्हा बँकेने पार केला 6 हजार कोटीच्या व्यवसाय टप्पा

रत्नागिरी जिल्हा बँकेने पार केला 6 हजार कोटीच्या व्यवसाय...