ध्वजारोहण, देशभक्तीपर कार्यक्रम आणि विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून भक्तीमय वातावरण
महाराष्ट्र उर्दू हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, कडवई येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळी ध्वजारोहणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. राष्ट्रध्वजाला मानवंदना देत उपस्थितांनी देशभक्तीचा जयघोष केला.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सादीक काजी, प्रशालेचे मुख्याध्यापक रिजवान कारीगर यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून देशप्रेम, राष्ट्रीय एकता आणि भारतीय संविधानातील मूल्यांचा प्रभावी संदेश देण्यात आला. शिस्तबद्ध संचलनामुळे कार्यक्रमात अधिकच उत्साह संचारला.
यावेळी प्रजासत्ताक दिनाचे ऐतिहासिक व राष्ट्रीय महत्त्व विशद करण्यात आले. भारतीय संविधानाने नागरिकांना दिलेले हक्क व कर्तव्ये यांची जाणीव करून देत विद्यार्थ्यांनी जबाबदार, जागरूक व कर्तव्यदक्ष नागरिक होण्याचा संकल्प करावा, असे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. एकूणच प्रजासत्ताक दिनाचा हा सोहळा उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
