कुसुमाग्रज नगरी नाशिक येथे महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग आयोजित चौथ्या विश्व मराठी संमेलनाच्या निमित्ताने आयोजित केलेली ‘भव्य शोभायात्रा’ हा केवळ एक सोहळा नसून तो मराठी अस्मितेचा आणि संस्कृतीचा जणू एक महाकुंभच होता. या शोभायात्रेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील लोककलांचे दर्शन घडविणारी लेझीम पथके, वासुदेव, धनगरी नृत्य, कोळी नृत्य, वारकरी यांचा समावेश होता. वाचन संस्कृतीचे आणि ज्ञानाचे प्रतीक तसेच ‘मराठी भाषेचा सन्मान’ म्हणून पालखीमध्ये ग्रंथ ठेवून ही दिंडी या शोभायात्रेच्या अग्रभागी होती. पारंपारिक नऊवारी, फेटा या पेहरावात सहभागी बालके, स्त्री पुरुष, आबालवृध्दांनी शोभायात्रेच्या परिसरातील वातावरण मराठीमय केले होते. तसेच विविध विषयांवरील चित्ररथ या यात्रेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, मराठी भाषेचा इतिहास, संतांची परंपरा दाखविणारे होते. श्री विठ्ठलाची चालती बोलती प्रतिकृती या शोभायात्रेचे विशेष आकर्षण होती. “मराठी पाऊल पडते पुढे…” या ओळींना सार्थ ठरवत ही शोभायात्रा संमेलनस्थळी के. टी. एच. एम महाविद्यालयाच्या प्रांगणात पोहचली.
कुसुमाग्रज नगरी नाशिक येथे महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग आयोजित चौथ्या विश्व मराठी संमेलनाच्या निमित्ताने आयोजित केलेली ‘भव्य शोभायात्रा’ हा केवळ एक सोहळा नसून तो मराठी अस्मितेचा आणि संस्कृतीचा जणू एक महाकुंभच होता.
