जाकादेवी :- रत्नागिरी तालुक्यासह करबुडे जिल्हा परिषद गटामध्ये व आताच्या खालगाव जिल्हा परिषद गटात भाजप शिवसेनेच्या काळात प्रचंड मोठी विकास कामे झालेली आहेत.आजही विकास कामे सुरू आहेत. विकासासाठी महायुतीशिवाय पर्याय नाही. जाती-पातीचे राजकारण करणाऱ्या मंडळींना या निवडणुकीत त्यांची जागा दाखवून द्या, एवढेच नव्हे तर उबाठाच्या उमेदवारांची डिपॉझिट जप्त होण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना विक्रमी मताने निवडून आणण्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी ताकदीने प्रचार यंत्रणेत उतरा, असे आवाहन करत खालगाव जिल्हा परिषद गटामध्ये आपल्या महायुतीच्या अधिकृत उमेदवारांचा विजय शंभर टक्के असल्याचा ठाम विश्वास राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी खालगाव जिल्हा परिषद गटामध्ये आयोजित आढावा बैठकीत कार्यकर्त्यांसमोर बोलून दाखवला.
येत्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना विक्रमी मताने निवडून देण्याचे आवाहन उद्योग मंत्री यांनी केले. विकास हाच आमचा ध्यास, विकासासाठी महायुतीशिवाय पर्याय नाही, रत्नागिरी तालुक्यातील अनेक गावांचा विकास हा भाजप शिवसेना युती काळात झालेला आहे. त्यामुळे या निवडणुकीत खालगाव जिल्हा परिषद गटातील उमेदवारांना ९० टक्के पेक्षा मतदान होणार आहे. खालगाव जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गट यामध्ये महायुतीचेच उमेदवार शंभर टक्के विजय होणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी असे सांगून महायुतीच्या विजयी उमेदवारांनी समाजातील व्यक्तींच्या सेवेसाठी २४ तास दिले पाहिजेत. एवढेच नव्हे तर विजयी उमेदवारांनी जनतेचे सेवक म्हणून काम करावे, अशी उमेदवारांना कर्तव्याची जाणीव करून देत महायुतीच्या कार्यकर्त्यांना रोजगाराच्या दृष्टीने सक्षम बनविण्यासाठी अनेक उद्योग, व्यवसाय कोकणात आणले जातील.महिला बचत गटांची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी आपण सर्वोतोपरी प्रयत्नशील असल्याचे ते बोलले.