ग्रामीण रुग्णालय राजापूर येथे नव्याने उभारण्यात आलेल्या रक्त साठवणूक केंद्राचे आमदार किरण सामंत यांच्या हस्ते उद्घाटन
👉राजापूर तालुक्यातील आरोग्य सेवेला मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण टप्पा गाठत ग्रामीण रुग्णालय राजापूर येथे नव्याने उभारण्यात आलेल्या रक्त साठवणूक केंद्राचे उद्घाटन लांजा-राजापूर विधान सभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.
या प्रसंगी बोलताना आमदार सामंत यांनी सांगितले की, ग्रामीण भागात वेळेवर रक्त उपलब्ध न झाल्यामुळे अनेक रुग्णांना जीवघेण्या परिस्थितीला सामोरे जावे लागते. ही बाब लक्षात घेऊन राजापूर येथे रक्त साठवणूक केंद्र सुरू करण्यात आले असून, यामुळे अपघातग्रस्त, गरोदर माता, शस्त्रक्रिया रुग्ण तसेच आपत्कालीन परिस्थितीत असणाऱ्या रुग्णांना त्वरित रक्त उपलब्ध होणार आहे.
ते पुढे म्हणाले की, आरोग्य सुविधा बळकट करणे ही काळाची गरज असून, ग्रामीण भागातील नागरिकांना शहरांमध्ये धाव घ्यावी लागू नये, यासाठी शासनाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जात आहेत. राजापूर येथील हे केंद्र तालुक्यातील नागरिकांसाठी जीवनदायी ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या केंद्रामध्ये रक्त सुरक्षितरीत्या साठवण्यासाठी आवश्यक आधुनिक यंत्रसामग्री, शीतगृह व्यवस्था तसेच प्रशिक्षित कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे रुग्णालयाची कार्यक्षमता वाढण्यास मोठी मदत होणार आहे.
उद्घाटन कार्यक्रमाला वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, स्थानिक पदाधिकारी, तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. उपस्थितांनी या उपक्रमाचे स्वागत करत आमदार किरण सामंत यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.
राजापूर तालुक्यातील आरोग्य सुविधांमध्ये हा एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात असून, भविष्यात आणखी सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस देखील यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, राजापूर तालुका सभापती नंदनी कदम, गटविकास अधिकारी संतोष मेत्रे, जिल्हा परिषद सदस्य कोमल नवाळे ,जिल्हा परिषद सदस्य प्रतीक मटकर, तालुकाप्रमुख दीपक नागले, जिल्हा परिषद सदस्य रमेश सूत, उपसभापती अभिजीत गुरव, पंचायत समिती सदस्य प्रसाद मोहरकर, गौतम जाधव, स्पृहा गुरव, जानवी गावकर, चंद्रकांत जानकर ,सानवी रावण सुयोगा जठार ,उर्मिला बाकालकर,प्रेरणा नार्वेकर दिलीप चव्हाण, महिला तालुकाप्रमुख शुभांगी डाबरे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर बाळाजी लोकरे, डॉ. राम मेस्त्री आदी उपस्थित होते.
