नागपूर, गरिबांना लुटा आणि श्रीमंतांना वाटा हेच धोरण महायुती सरकारचे असल्याचे सांगत रेडीरेकनर दर वाढ म्हणजे गरीब आणि मध्यमवर्गीयांना घरच्या स्वप्नापासून सामान्य व्यक्तीला दूर नेण्याचा कट असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना केला.*
ते म्हणाले, ‘नवीन आर्थिक वर्षात शेतकऱ्यांना दिलेली वचने पूर्ण करा, शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. त्यांच्या कुटुंबांना वाचवा. शेतकरी कर्जातून मुक्त करा, अशीच आमची अपेक्षा आणि मागणी आहे. राज्याची आर्थिक स्थिती बिकट आहे. राज्य कर्जबाजारी झालेले आहे.
कर्ज काढून राज्य चालवणे हेच सरकारच्या हाती आहे. नवीन योजना ते सुरू करू शकत नाही. येणाऱ्या काही महिन्यांमध्ये कर्मचाऱ्यांचे वेतन देताना सरकारची दमछाक होईल, अशी राज्याची स्थिती झाली आहे. त्यामुळेच महसूल वाढविण्यासाठी नवनवीन युक्ता सरकार लढवीत आहे.
पथकरही वाढविण्यात आलेला आहे. देशाची आर्थिक स्थिती खिळखिळी झालेली असताना बारा लाख कोटी रुपये उद्योजकांचे माफ केले आहे. शेतकऱ्यांना मात्र, एक रुपयाचीही कर्जमाफी दिली गेलेली नाही.’
सत्ता सर्वांना प्रिय असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वयाची ७५ वर्षे झाल्यानंतरही खुर्चीवर राहण्याची सवलत दिली असेल तर तो भाजपचा पक्षांतर्गत विषय आहे. भाजपने जर मोदी यांना ९० वयाच्या वर्षांपर्यंत पदावर ठेवण्याचा निर्णय घेतला असले तर त्यावर आमचा आक्षेप असण्याचे कारण नाही.*