रत्नागिरीचिपळूण नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांचे पदभार ग्रहण — “नगराध्यक्ष आपल्या दारी” अभियानाची...

चिपळूण नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांचे पदभार ग्रहण — “नगराध्यक्ष आपल्या दारी” अभियानाची घोषणा

शाहिद अहमद तुळवे/कडवई

दि. ३१ डिसेंबर

चिपळूण नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष उमेश धोंडीराम सकपाळ यांनी अधिकृतपणे काल पदभार स्वीकारला असून नगरपरिषद सभागृहात पार पडलेल्या पदभार ग्रहण समारंभात चिपळूणचे माजी आमदार तथा शिव सेना नेते सदानंद चव्हाण, गुहागरचे माजी आमदार विनय नातू , भाजपा नेते प्रशांत यादव, नगरपरिषदेचे अधिकारी, नगरसेवक, भाजपा – शिव सेना महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पदभार स्वीकारताच नगराध्यक्ष सकपाळ यांनी चिपळूण शहराच्या सर्वांगीण विकासाचा निर्धार व्यक्त करत “नगराध्यक्ष आपल्या दारी” या लोकाभिमुख अभियानाची घोषणा केली.
नगराध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर बोलताना उमेश सकपाळ यांनी सांगितले की, नगरपरिषद आणि नागरिक यांच्यात थेट संवाद असणे अत्यंत आवश्यक आहे. नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी त्यांना नगरपरिषद कार्यालयात यावे लागू नये, तर लोकप्रतिनिधी स्वतः नागरिकांपर्यंत पोहोचले पाहिजेत, या भूमिकेतून “नगराध्यक्ष आपल्या दारी” अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत शहरातील विविध प्रभागांमध्ये प्रत्यक्ष भेटी देऊन नागरिकांच्या दैनंदिन समस्या, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, वीज, आरोग्य, गटार व्यवस्था तसेच अन्य नागरी सुविधांबाबत तक्रारी जाणून घेतल्या जाणार आहेत. प्राप्त तक्रारींवर संबंधित विभागांमार्फत तातडीने कार्यवाही करून त्याचा आढावा घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
नगराध्यक्ष सकपाळ यांनी आपल्या भाषणात चिपळूण शहराच्या विकासासाठी प्राधान्यक्रम ठरविण्याची गरज असल्याचे नमूद केले. शहरातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करणे, रखडलेली विकासकामे मार्गी लावणे, पुररेषा पुनर्विलोकन करणे, स्वच्छ आणि सुंदर चिपळूणसाठी विशेष मोहिमा राबविणे, तसेच युवक, महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र विकास योजना प्रभावीपणे अंमलात आणण्याचा आपला मानस असल्याचे त्यांनी सांगितले. नगरपरिषद प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्यात समन्वय साधून पारदर्शक व लोकहिताचा कारभार देण्यावर भर राहील, असेही त्यांनी नमूद केले.
चिपळूण नगरपरिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार उमेश सकपाळ यांना बहुमताने विजयी मिळाल्यानंतर शहरात नव्या नेतृत्वाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शहरातील विकासकामांना गती मिळेल, तसेच नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. पदभार ग्रहण समारंभानंतर विविध मान्यवरांनी नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांचे अभिनंदन करत त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
आपल्या भाषणाच्या शेवटी नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी चिपळूणकरांनी दाखविलेल्या विश्वासाला तडा जाऊ न देता काम करण्याचा संकल्प व्यक्त केला. प्रत्येक नागरिकाचा प्रश्न हा आपला प्रश्न असून, प्रत्येक घर हेच आपले कार्यालय मानून काम केले जाईल, अशी ग्वाही देत “नगराध्यक्ष आपल्या दारी” अभियानातून लोकाभिमुख प्रशासनाचा नवा आदर्श निर्माण करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. या घोषणेमुळे चिपळूण शहराच्या विकासाबाबत नव्या अपेक्षा निर्माण झाल्या असून, पुढील काळात या अभियानाच्या अंमलबजावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Breaking News