महाराष्ट्रचिपळूण सायकलिंग क्लबच्या श्रीकांत जोशी यांची १००० किमी बीआरएम पूर्ण

चिपळूण सायकलिंग क्लबच्या श्रीकांत जोशी यांची १००० किमी बीआरएम पूर्ण

ऑडाक्स इंडिया रँडोनिअर्स संलग्न सह्याद्री रँडोनिअर्स, चिपळूण तर्फे नुकतेच १००० किमी बीआरएम चे आयोजन करण्यात आले होते. यामधे सहभागी होऊन चिपळूण सायकलिंग क्लबच्या श्रीकांत जोशी यांनी वयाच्या छप्पनाव्या वर्षी ही कामगिरी केली आहे. श्रीकांत जोशी यांचे समवेत कराड येथील रविराज जाधव व चंद्रजित पाटील हे रायडर्स देखील सहभागी झाले होते.

ऑडाक्स इंडिया रँडोनिअर्सच्या अंतर्गत भारतातील विविध क्लब बीआरएम या सायकल क्रीडाप्रकाराचे आयोजन करतात. २००, ३००, ४००, आणि ६०० किमी अंतर सायकल चालविण्यासाठी अनुक्रमे १३.५ तास, २० तास, २७ तास आणि ४० तासांची मूदतवेळ निर्धारित केलेली असते. तर १००० किमी साठी ७५ तासांची वेळ निश्चित केलेली असते. संपूर्ण पणे सेल्फ सपोर्टेड असं या राईड्सचे स्वरुप असते. जानेवारी ते डिसेंबर या मुदतीत सदर बीआरएम पूर्ण केल्यानंतर रायडरला सुपर रँडोनिअर म्हणून किताब मिळतो. श्रीकांत जोशी यांनी यापूर्वीच सुपर रँडोनिअर हा किताब पटकावलेला असून १००० किमी बीआरएम पूर्ण करुन त्यांनी आपल्या शीरपेचात नवीन पीस खोवले आहे.

श्रीकांत जोशी हे चिपळूण सायकलिंग क्लबचा सदस्य असून आपल्या या यशाबद्दल बोलताना चिपळूण सायकलिंग क्लबच्या सर्व सदस्यांच्या सहकार्याने आपण हे यश मिळविल्याचे त्याने नमूद केले. नोसिल कंपनीमधून निवृत्ती घेतल्यानंतर बागकाम व इतर आवडी जोपासत असतानाच कोरोनानंतरच्या कालखंडात सायकलिंगची आवड त्यांना या विक्रमांकडे घेऊन गेली.

सह्याद्री रँडोनिअर्स क्लबने कराड सोलापूर अंबेजोगाई, सोलापूर, विजापूर, कराड या मार्गावर सदर बीआरएम आयोजित केली होती. सायकलपटूंची सुरक्षितता जपत असतानाच त्यांचे मनोबल कसं उंचावेल, त्यांचा आहार, तब्येत याकडे विशेष लक्ष ठेवल्याबद्दल सह्याद्री रँडोनिअर्सचे सर्वेसर्वा श्री. मनोज भाटवडेकर यांच्याविषयी आदरभाव व्यक्त करताना श्रीकांत जोशी यानी आयोजकांचं संपूर्ण रुटवर उपस्थित असणं हे फार मोठं महत्वाचं ठरतं असं सांगितलं.

श्रीकांत जोशी यांच्या या कामगिरीबद्दल चिपळूण सायकलिंग क्लब, मित्रपरिवार तसेच समाजातील सर्व घटकांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

Breaking News