जळगाव : जळगावनजीकच्या परधाडे रेल्वेस्थानकानजीक ‘पुष्पक एक्स्प्रेस’च्या डब्याला बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास आग लागल्याच्या अफवेमुळे डब्यातील प्रवाशांनी भीतीपोटी रुळावर उड्या मारल्या आणि त्याचवेळी समोरून सुसाट वेगाने आलेल्या ‘बंगळूर एक्स्प्रेस’खाली सापडून 13 प्रवासी जागीच ठार झाले.
यामध्ये नेपाळच्या तीन प्रवाशांचा समावेश आहे; तर 19 प्रवासी जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच मंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्यासह रेल्वेचे महाव्यवस्थापक व आपत्ती व्यवस्थापनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. त्यांनी मदतकार्याला सुरुवात केली आहे.
जळगावहून पाचार्याकडे निघालेल्या ‘पुष्पक एक्स्प्रेस’च्या चालकाने परधाडे स्थानकाजवळील एका वळणावर गाडीचा वेग कमी करण्यासाठी ब्रेक लावला. गाडीचा वेग कमी होत असताना एका डब्याच्या चाकाजवळून अचानक मोठ्या प्रमाणात धूर येऊ लागला. या डब्यात दरवाजात बसलेल्या तरुणांनी त्यामुळे डब्याला आग लागल्याचा आरडाओरडा सुरू केला. त्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट उडाली. गाडी थांबताच या तरुणांसह सुमारे 100 प्रवासी रुळावर उतरले.
प्रवाशांनी रेल्वेतून उड्या टाकल्या. त्याचवेळी ‘न्यू दिल्ली-बंगळूर एक्स्प्रेस’ सुसाट वेगाने जळगावकडे येत होती. जोरदार वेगामुळे या एक्स्प्रेसच्या चालकाला गाडीचा वेग कमी करण्याची संधीच मिळाली नाही. त्यामुळे रेल्वे रुळावर उभे असलेले अकरा प्रवासी अवघ्या दोन ते तीन सेकंदांत चिरडले गेले. रेल्वे रुळावर प्रवाशांच्या मृतदेहाचे तुकडे सर्वत्र विखुरलेले होते. हे भीषण द़ृश्य पाहून अन्य प्रवाशांच्या अंगावर काटा आला. या दुर्घटनेत 40 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळाली.
मृतांत परप्रांतीयांची संख्या अधिक
रेल्वेच्या पथकाने जखमी प्रवाशांना पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले आहे. तेथे उपचार सुरू करण्यात आलेले आहेत. मृतांमध्ये परप्रांतीय प्रवाशांची संख्या अधिक असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
मृतांच्या कुटुंबांना राज्य सरकारकडून पाच लाख रुपयांची मदत ः फडणवीस
जळगाव रेल्वे अपघातातील मृतांच्या कुटुंबांना राज्य सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे. जखमींचा संपूर्ण उपचार मोफत करण्यात येईल. जखमींच्या नातेवाइकांना रुग्णालयात सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मंत्री गिरीश महाजन घटनास्थळी दाखल झाले असून, सर्व परिस्थिती सांभाळत आहेत, अशी माहितीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोसहून बोलताना दिली.