दापोली येथे महाराष्ट्र राज्य उमेदच्या अंतर्गत ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समूहांतील महिलांच्या कर्तृत्वाचे आणि कौशल्याचे दर्शन घडवणाऱ्या जिल्हास्तरीय सरस प्रदर्शन व विक्री सोहळ्याचे उद्घाटन राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत ह्यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.
यावेळी ना. उदय सामंत ह्यांनी बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या खाद्यपदार्थ, मसाले, ग्रामीण कलाकुसर, आंबा-काजूचे विविध पदार्थ, कोकणी मेवा आदींच्या स्टॉल्सची पाहणी केली. महिलांच्या उत्कृष्ट कौशल्याचे दर्शन घडवणाऱ्या या प्रदर्शनातून ग्रामीण भागातील महिलांना उद्योजकतेच्या दृष्टीने नवी दिशा मिळण्यास मदत होणार आहे.
उमेदच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणा साठी विविध योजना कार्यरत असून महिलांनी उद्योग व्यवसायात पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी ना. उदय सामंत ह्यांनी केले.
या कार्यक्रमाला राज्यमंत्री योगेश कदम, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदई रानाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. मोठ्या संख्येने महिला भगिनींच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी उमेदची ही वाटचाल प्रेरणादायी ठरली असून महिलांनी या संधीचा लाभ घेत उद्योग व्यवसायात पुढे यावे, असे प्रतिपादन यावेळी . ना. उदय सामंत ह्यांनी केले.
