रत्नागिरीडिंगणी येथे बिबट्याचा हैदोस; शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर घाला, प्रशासनाने दाखल घेण्याची मागणी

डिंगणी येथे बिबट्याचा हैदोस; शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर घाला, प्रशासनाने दाखल घेण्याची मागणी

डिंगणी येथे बिबट्याचा हैदोस; शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर घाला, प्रशासनाने दाखल घेण्याची मागणी.

संगमेश्वर /एजाज पटेल

डिंगणी गावात सध्या बिबट्याचा अक्षरशः हैदोस सुरू असून मानवी वस्तीत घुसून पाळीव जनावरांचा फडशा पाडण्याचा त्याचा एककलमी कार्यक्रम सुरू आहे. गावातील काळ मोहल्ला परिसरात काही दिवसांपूर्वी वासराचा बळी घेतल्यानंतर आता ग्रामपंचायत माजी सदस्य सुदर्शन मोहिते यांच्या किमती गाईचा बिबट्याने फडशा पाडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अवघ्या काही दिवसांत घडलेल्या या दोन घटनांमुळे गावात भीतीचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे.

सुदर्शन मोहिते हे उच्चशिक्षित असून त्यांनी शिक्षण पूर्ण केले असले तरी त्यांना शासकीय नोकरी मिळालेली नाही. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्यांनी शेतीसोबत दुग्ध व्यवसायाचा मार्ग स्वीकारला. काही महिन्यांपूर्वी परजिल्ह्यातून एफएच जातीची, जास्त दूध देणारी आणि किमती असलेली गाय त्यांनी विकत आणली होती. संसाराला हातभार लागावा, आर्थिक स्थैर्य यावे या उद्देशाने केलेली ही गुंतवणूक एका रात्रीत बिबट्याने संपवली.
घरालगतच्या गोठ्यात इतर गुरांसोबत वावरत असताना बिबट्याने अचानक झडप मारून गाईचा फडशा पाडला. हल्ल्यावेळी इतर जनावरे जीवाच्या आकांताने सैरावैरा पळाली. बिबट्या कोणताही भय न बाळगता मानवी वस्तीत घुसत असल्याने ग्रामस्थांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला आहे.

“शिक्षण घेतले, कष्ट केले, संसार उभा करण्यासाठी जनावरे विकत घेतली; पण त्यावरच संकट आले तर जगायचे कसे?” असा संतप्त सवाल सुदर्शन मोहिते यांनी उपस्थित केला आहे. एका किमती दुभत्या गाईच्या मृत्यूमुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून दुग्ध व्यवसायावरच घाला बसला आहे.

गावात मोकाट भटक्या कुत्र्यांची संख्या लक्षणीयरीत्या घटल्याचे ग्रामस्थ सांगतात. बिबट्याच्या तावडीतून भटक्या श्वानांचीही सुटका होत नसल्याने तो नियमितपणे गावात येत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी नागरिक भयभीत अवस्थेत राहत आहेत. महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

अवघ्या काही दिवसांत दोन मोठ्या घटना घडूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई झालेली नाही, अशी ग्रामस्थांची तक्रार आहे. वनविभागाने केवळ पंचनामा करून औपचारिकता पूर्ण न करता तातडीने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावावेत, नियमित गस्त वाढवावी आणि सीसीटीव्ही किंवा ट्रॅप कॅमेरे बसवावेत, अशी जोरदार मागणी होत आहे. तसेच बाधित शेतकऱ्यांना त्वरित आणि योग्य ती नुकसानभरपाई देण्याचीही मागणी करण्यात येत आहे.

पाळीव मुक्या जनावरांवर ओढवलेले हे संकट केवळ एका कुटुंबापुरते मर्यादित नसून संपूर्ण गावाच्या उपजीविकेवर घाला घालणारे आहे. वेळेत उपाययोजना न केल्यास भविष्यात मानवी जीवितहानीची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी तातडीने हस्तक्षेप करून गावकऱ्यांना सुरक्षिततेची हमी द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

Breaking News