संगमेश्वर तालुक्यातील तेर्ये गावचा सुपुत्र आणि समाजकार्याची जिवंत ओळख ठरलेले मा. सुनील गेल्ये यांना विश्व समता कलामंच या सामाजिक संस्थेच्या वतीने दिला जाणारा “विश्व समता राज्यस्तरीय समाजभूषण” पुरस्कार आज अत्यंत दिमाखदार वातावरणात प्रदान करण्यात आला. लोवले (ता. संगमेश्वर) येथील मयूरबाग परिसरातील शुभगंधा हॉलमध्ये सायंकाळी ६ वाजता झालेल्या या सोहळ्यास तालुक्यासह जिल्हा आणि परजिल्ह्यातील नागरिकांची लक्षणीय उपस्थिती लाभली.
बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या समतेच्या आणि मानवतावादी विचारसरणीवर चालणाऱ्या या संस्थेकडून गेली अनेक वर्षे विविध क्षेत्रांत निःस्वार्थपणे कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव केला जातो. गेली दोन दशके कोणतीही अपेक्षा न ठेवता, प्रसिद्धीपासून दूर राहून समाजातील तळागाळातील, वंचित आणि दुर्लक्षित घटकांसाठी सातत्याने कार्य करणाऱ्या सुनील गेल्ये यांच्या कार्याची दखल घेत यंदाचा पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला होता. आज प्रत्यक्ष सोहळ्यात त्यांचा सन्मानचिन्ह, मानपत्र आणि मानाचा पट्टा देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास तालुक्याचे माजी सभापती दिलीप पेंढारी, अनंत मांडवकर, संजय गेल्ये, जनार्दन शिरगावकर, अजित मोहिते, प्रचित मोहिते, सतीश पवार, उमेश बाईत यांच्यासह विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सुनील गेल्ये यांच्या सौभाग्यवती सुप्रिया सुनील गेल्ये व चिरंजीव ओंकार गेल्ये हेही या आनंदक्षणाचे साक्षीदार ठरले. मान्यवरांच्या हस्ते सन्मान स्वीकारताना सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला आणि उपस्थितांनी उभे राहून त्यांचे स्वागत केले.
तळागाळातील कार्याची दखल,मा. सुनील गेल्ये यांचे समाजकार्य केवळ औपचारिक उपक्रमांपुरते मर्यादित नाही. गावातील गरजू कुटुंबांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, रुग्णांसाठी तातडीने आर्थिक मदत उभी करणे, रक्तदान शिबिरांचे आयोजन, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वह्या-पुस्तकांची मदत, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, तसेच पूर किंवा नैसर्गिक आपत्तीच्या काळात प्रत्यक्ष मदतकार्य अशा अनेक क्षेत्रांत त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.
कोणतीही हाक आली की वेळ, दिवस, रात्र न पाहता धावून जाणे ही त्यांची ओळख बनली आहे. त्यामुळेच तेर्ये गावापुरते नव्हे, तर संपूर्ण संगमेश्वर तालुक्यात “आपला माणूस” म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
संस्थेचा गौरवोद्गार,कार्यक्रमात संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सुनील गेल्ये यांच्या कार्याचा आढावा घेताना सांगितले की, “समाजकार्य म्हणजे केवळ कार्यक्रम नाही, तर तो सातत्याने जगण्याचा दृष्टिकोन आहे. गेल्ये यांनी तो आचरणातून दाखवून दिला आहे. त्यांच्या कार्यात प्रसिद्धीपेक्षा परिणामकारकतेला महत्त्व आहे.”
त्यांच्या सातत्य, पारदर्शकता आणि निःस्वार्थ सेवाभावाचे विशेष कौतुक करण्यात आले.
“हा सन्मान माझ्या समाजाचा” सुनील गेल्ये
पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना मा. सुनील गेल्ये भावुक झाले. ते म्हणाले,
“आज मिळालेला हा सन्मान माझा वैयक्तिक नसून माझ्या कुटुंबाचा, सहकाऱ्यांचा आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्व समाजबांधवांचा आहे. समाजाने मला दिलेल्या प्रेमाचे हे फळ आहे. या सन्मानामुळे माझी जबाबदारी अधिक वाढली आहे. पुढेही वंचित, गरजू आणि दुर्लक्षित घटकांसाठी अधिक जोमाने कार्य करत राहीन.”
त्यांच्या या मनोगताला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.
तालुक्यात आनंदाचे वातावरण,सुनील गेल्ये यांच्या पुरस्कार निवडीपासूनच तेर्ये गावात आणि संगमेश्वर तालुक्यात आनंदाचे वातावरण होते. आज प्रत्यक्ष सन्मान झाल्यानंतर ग्रामस्थ, युवक, विविध सामाजिक संस्था आणि मित्रपरिवाराकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
“सुनील गेल्ये हे केवळ कार्यकर्ते नाहीत, तर संकटसमयी धावून येणारे आधारवड आहेत,” अशी भावना माजी सभापती दिलीप पेंढारी यांनी व्यक्त केली.समाजासाठी स्वतःला झोकून देणाऱ्या व्यक्तीचा राज्यस्तरावर सन्मान झाल्याने तेर्ये गावाची मान उंचावली असून, या पुरस्कारामुळे समाजातील माणुसकी, समता आणि सेवाभाव अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
