महाराष्ट्रदेशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या शूरवीर शहीद जवान संदीप पांडुरंग गायकर यांना त्यांच्या...

देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या शूरवीर शहीद जवान संदीप पांडुरंग गायकर यांना त्यांच्या घरी जाऊन राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री ना. उदय सामंत ह्यांनी आदरांजली अर्पण केली.

ब्राम्हणवाडा (ता.अकोले. जि. अहिल्यानगर) येथील सुपुत्र असलेल्या संदीप हे जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सैन्याच्या १७ राष्ट्रीय रायफल युनिटमध्ये कार्यरत होते. देशसेवा करतांना त्यांना वीरमरण आलं. संदीप हे १५ मराठा लाईफ इन्फन्ट्री या प्रतिष्ठित सैन्य बटालियनचे जवान होते. शहीद संदीप गायकर हे त्यांच्या आई-वडिलांचे एकुलते एक पुत्र होते. त्यांच्या जाण्याने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. संदीप यांच्या पश्चात त्यांच्या बहिणी आई-वडिलांना आधार देत आहेत. मात्र, कुटुंबाचा मुख्य आधार गेल्याने शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या निर्देशानुसार शहीद जवान संदीप गायकर यांच्या पत्नी दिपाली गायकर व त्यांच्या आई-वडिलांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली, असे यावेळी मशना. उदय सामंत ह्यांनी सांगितले.

यावेळी शहीद संदीप यांच्या कुटुंबियांना धीर देत, त्यांच्या दुःखात सहभागी होत ना. उदय सामंत ह्यांनी त्यांच्यासोबत संवाद साधला. “शहीद संदीप यांचे बलिदान देश कधीही विसरणार नाही. त्यांच्या कुटुंबाच्या मागे राज्य शासन कायम उभं राहील, अशी ग्वाही मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी यावेळी दिली.

यावेळी सहकारी आमदार शरददादा सोनवणे, शिवसेनेचे सचिव राम रेपाळे, उत्तर नगर जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख बाजीराव दराडे, उपजिल्हाप्रमुख एकनाथ यादव, सरपंच सुभाष गायकर यांच्यासह शिवाजी आरोटे, अक्षय आरोटे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Breaking News