रत्नागिरी, (जिमाका):- एकत्रित आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व वय वंदना कार्ड योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावा. याकरिता विशेष मोहिम राबविणेबाबत सूचना जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिल्या.
बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी भाउसाहेब गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विकास कुमरे आदी उपस्थित होते.
https://beneficiary.nhea.gov.in या पोर्टल/ॲप वर लॉगिन करुन स्वत: च आपले आयुष्यमान कार्ड तयार करता येते. सर्व आशा स्वंयसेविका व अंगणवाडी सेविका यांनी लाभार्थ्यांचे कार्ड तयार करावे. या मोहिमेमध्ये आपले सरकार सेवा केंद्र, आशासेविका, स्वस्त धान्य दुकान चालक, आरोग्य मित्र, सरपंच, ग्रामपातळी वरील शासकीय अधिकारी व कर्मचारी, महाविद्यालयीन विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक संघ स्वयंसेवी संस्था यांचा सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी केले.
एकत्रित आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत १ हजार ३५६ उपचार व शस्त्रकियेसाठी प्रति कुटूंब प्रति वर्ष रुपये ५ लाख आरोग्य संरक्षण व २ हजार ३०० पेक्षा जास्त शासकीय व खाजगी रुग्णालयात उपचार घेता येतात. आयुष्यमान वय वंदना योजनेअंतर्गत ७० वर्षावरील जेष्ठ नागरिकांसाठी अतिरिक्त ५ लाख रुपये लाभ दिला जातो.
सदर योजनेचे लाभ कुटुंब आधारित असल्याने इ-केवायसी करण्यासाठी रेशन कार्डची व आधार कार्डची माहिती वापरली जाते. जिल्हयातील सर्व नागरिकांनी रेशन कार्ड इ-केवायसी करुन घ्यावे.
बैठकीला सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी व वैदयकीय अधिकारी हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
प्रधानमंत्री जनआरोग्य योजना मोहिमेंतर्गतलाभार्थ्यांचे कार्ड तात्काळ काढावे- जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह
